

कोल्हापूर : किणी टोल नाका- वाठार महामार्गावर आरामबसवरील दरोड्यात कोट्यवधीचे दागिने हाती लागल्याने सूत्रधारासह साथीदारांच्या तोंडाला पाणी सुटले होते. प्रत्येकी 25 ते 30 लाखांचा वाटा अपेक्षित होता. कर्ज फिटेल, घर होईल, पत्नीही मिळेल... प्रत्येकजण वेगवेगळी स्वप्ने रंगवित होता. सांगलीतील साथीदार लवकर ‘वाटा’ मिळावा, यासाठी धडपडत होते. मंगळवारी तिघेही कोल्हापूरच्या दिशेने सुसाट निघाले. दुपारी सांगली फाट्यावर काहीकाळ थांबले. तोच दबा धरलेल्या पथकाने तिघांना गराडा घातला अन् त्यांच्या मुसक्या आवळल्या...
विक्रमनगर येथील सूत्रधार अक्षय कदम (वय 31) याने आरामबसचा वाहक सैफू अफगाणी आणि त्याचा भाऊ जैद अफगाणी (रा. उचगाव, ता. करवीर) याने दिलेल्या टिपनुसार कोल्हापूरहून मुंबईकडे जाणारी बस लुटण्याचा प्लॅन केला. रविवारी सकाळी टोळीतील चार साथीदारांची अक्षय कदम याच्या घरी आणि सायंकाळी टेंबलाईवाडी चौकात बैठक झाली. त्यात दरोड्याचा बेत ठरला. प्रत्येकावर जबाबदारी निश्चित करण्यात आली. वाहक सैफू अफगाणी याच्याकडून कोणत्याही क्षणी सिग्नल मिळताच प्रत्येकाने आपापली जबाबदारी पार पाडण्यावर सर्वांचे एकमत झाले.
संशयित सुजल चौगुले हा सूत्रधार अक्षयचा भाचा. सांगली आकाशवाणी केंद्राजवळ त्याचे वास्तव्य असते. अक्षयने सुजलशी सोमवारी दुपारी संपर्क साधला. त्याने विश्वासू असलेल्या एक-दोन मित्रांना घेऊन कोल्हापूरला येण्याचा निरोप धाडला. सुजल सोमवारी सायंकाळी साथीदार आदित्य कांबळे व आदिनाथ विपते यांना घेऊन मोपेडवरून कोल्हापूरला तावडे हॉटेलजवळ येऊन थांबला. अक्षयने रात्री सुजलसह त्याच्या मित्रांशी संपर्क साधला. दरोड्याच्या कटाची माहिती दिली. प्रत्येकाच्या वाट्याचे 15 ते 20 लाखांचे आमिष दाखविले.
टोळीचा प्लॅन ठरलाच आहे... आपणावर दिलेली जबाबदारी पार पाडायची... असा तिघांचा निर्धार... रात्री साडेदहा वाजता आरामबसने तावडे हॉटेल सोडले. तिघांनी कोल्हापूरकडे धावणार्या आराम बसचा पाठलाग करायचा... बस लुटताना कोणाचा अडथळा होणार नाही, बसच्या डिकीतून किमती ऐवज ताब्यात घेताना म्होरक्यांना मदत करून त्याचक्षणी कोल्हापूरच्या दिशेने मोपेडवरून पलायन करण्याची त्याच्यावर जबाबदारी... बसवरील दरोड्यानंतर सुजलसह त्याचे दोघे मित्र रात्री उशिरा सांगली फाट्यावर आले. तेथून ते सांगलीकडे रवाना झाले.
महामार्गावर दरोडा पडल्यामुळे पोलिस खडबडून जागे झाले. नाकाबंदी झाली. वडगाव पोलिसांनी चालकासह वाहकाला चौकशीसाठी ताब्यात घेतले. रात्रभर अधिकारी, पोलिसांची पळापळ, धावपळ सुरू झाली. वाहक सैफू अफगाणीवर पोलिसांचा संशय होता. त्याच्यावर प्रश्नांचा भडिमार सुरू झाला. वाहक दिशाभूल करीत असल्याचे पोलिस उपअधीक्षक अमोल ठाकूर, सुशांत चव्हाण, सागर वाघ यांच्या निदर्शनास आले. पोलिसी खाक्या दाखविताच सैफने तोंड उघडले. सूत्रधार अक्षयचा दरोड्याचा कट उघड झाला. पाठोपाठ अन्य साथीदारांचीही नावे उघड होत गेली.
सांगलीतील तिघे कोण, याची माहिती फक्त अक्षयला होती. सागर वाघ यांच्यासह पथकाने विक्रमनगर येथील अक्षयच्या घरावर छापा टाकला. दुपारी तो घरात थांबला होता. ‘ एलसीबी’चा त्याच्या भोवती गराडा पडताच अक्षय भेदरला. सागर वाघ यांनी लुटलेल्या मालमत्तेबद्दल प्रश्न करताच त्याने खोलीत ठेवल्याचे सांगितले. पथकाने 60 किलो चांदीची पोते उचलले. सागर वाघ यांनी सूत्रधारावर दुसरा प्रश्न केला... सांगलीतील तिघे कोण... तो म्हणाला भाचा... सुजल चौगुले... पोलिसांच्या सूचनेप्रमाणे अक्षयने सुजलला फोन केला.
सुजल... वाट्याला आलेली चांदी घेऊन जा!
सुजल... मी मामा... अक्षय बोलतोय रे... तुमच्या तिघांच्या वाट्याला आलेली चांदी घेऊन जा... लवकर तिघेही कोल्हापूरला निघा... अक्षयने मोपेडचा क्रमांकही सुजलकडून विचारून घेतला. दुपारी अडीच वाजता तिघेही कोल्हापूरच्या दिशेने निघाले. पोलिसांनी साध्या वेशात सांगली फाट्यावर सापळा लावला. साडेतीन वाजता तिघेही सांगली फाट्यावर आले अन् पोलिसांच्या तावडीत सापडले.