कराडात साकारतेय वन्यजीव उपचार केंद्र 
सातारा

Wildlife Treatment Center : कराडात साकारतेय वन्यजीव उपचार केंद्र

काम अंतिम टप्प्यात : सातारा, कोल्हापूर, सांगली, सिंधूदुर्ग, रत्नागिरी जिल्ह्यांना फायदा

पुढारी वृत्तसेवा

सागर गुजर

सातारा : वन विभागाच्यावतीने विरवडे, ता. कराड येथे कोल्हापूर सर्कलचे वन्यजीव उपचार केंद्र साकारले जात आहे. या उपचार केंद्रामध्ये पश्चिम महाराष्ट्रासह तळ कोकणातील वन्यजीवांवर उपचारांची आधुनिक सुविधा उपलब्ध केली जाणार आहे. सातारा, कोल्हापूर, सांगली, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी या पाच जिल्ह्यांतील वन्यजीवांसाठी हे उपचार केंद्र संजीवनी ठरणार आहे.

राधानगरी, कोयना, चांदोली अभयारण्य व सह्याद्री व्याघ्र प्रकल्पांमुळे या पाचही जिल्ह्यांमध्ये वन्यजीवांचा मुक्त विहार आहे. या विस्तृत अशा घनदाट जंगलामध्ये बिबटे, हरणे, गवे, रानडुकरे, अस्वल, ससे, तरस मोठ्या प्रमाणावर आढळतात. आता हेच वन्यप्राणी लोकवस्तीमध्येही मोठ्या प्रमाणावर आढळून येवू लागले आहेत. विशेषत: ऊसाच्या शेतात बिबट्यांच्या माद्या पिल्लांना जन्म देतात. सह्याद्री व्याघ्र प्रकल्पामध्ये नुकत्याच विदर्भातून आणलेल्या दोन वाघिणी सोडण्यात आल्या असल्याने आता या परिसरात वाघांच्या डरकाळ्याही ऐकू येऊ लागल्या आहेत.

हे वन्यप्राणी अनेकदा जखमी अवस्थेत किंवा योग्य पोषणाअभावी अशक्त स्थितीत आढळून येतात. अशा प्राण्यांवर तत्काळ उपचाराची गरज असते. मात्र, कोल्हापूर सर्कलमध्ये या उपचारांची सुविधा उपलब्ध नाही. त्यामुळे या प्राण्यांना अधिक उपचारांसाठी पुण्याला हलवावे लागत असल्याने लागणार्‍या वेळेमुळे प्राणी जीवाला मुकण्याचे प्रकार होतात.

काय आहे उपचार केंद्रात?

या उपचार केंद्रामध्ये डॉक्टर्स, सहाय्यक आणि वन्यजीव रक्षक 24 तास उपलब्ध होणार आहेत. त्यांच्या राहण्याची सोय करण्यात येत आहे. दुर्दैवाने प्राणी दगावला तर त्याचे पोस्टमार्टमही याच ठिकाणी करता येणार आहे. तसेच स्मशानभूमीची सोय देखील इथे करण्यात येणार आहे. वन्यप्राण्यांवर उपचारासाठी प्रशस्त दवाखाना इथे असेल. वाघ, बिबटे अशा मांसभक्षी प्राण्यांसाठी प्रशस्त जागा असलेले पिंजरे तसेच हरणे, रानडुकरे, गवे, यांच्यासाठी स्वतंत्र पिंजरे याठिकाणी असतील. या प्राण्यांवर उपचार करण्यासाठी तसेच त्यांना खाद्य पुरवण्यासाठीही वेगळे पिंजरे असतील. उपचार केलेले प्राणी देखरेखीखाली ठेवण्यासाठी या पिंजर्‍यांची व्यवस्था भव्य अशी असणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT