Traffic  Pudhari
सातारा

Satara News: एका हातात मोबाईल अन् दुसऱ्या हातात हँडल !

कराड-पाटण तालुक्यात वाहतूक नियमांची ऐशीतैशी; कारवाई करूनही चालक बेफिकीरच

पुढारी वृत्तसेवा

कराड : हातात मोबाईल, कानाला फोन आणि रस्त्यावर सुसाट धावणारे वाहन... स्वतःच्या जीवाची पर्वा नाहीच, पण इतरांच्याही जीवाशी खेळ सुरू ! कराड शहरासह संपूर्ण कराड-पाटण तालुक्यात वाहन चालविताना मोबाईलवर बोलण्याचे प्रकार सर्रास दिसत असून, वाहनचालकांच्या या बेजबाबदारपणामुळे अपघातांचा धोका वाढला आहे. वाहतूक पोलिसांकडून कारवाई होत असतानाही अनेक चालकांना त्याचे काहीच देणे-घेणे नसल्याचे चित्र आहे.

कराड शहरात तर वाहन चालविताना मोबाईलवर बोलणारे चालक नेहमीच नजरेस पडतात. कराड तालुक्यातील रेठरे, वाठार, उंब्रज, पाल, मसूर, शेणोली स्टेशनसह पाटण तालुक्यातील चाफळ, ढेबेवाडी, पाटण, कोयनानगर परिसरातही ही समस्या गंभीर बनत आहे. दुचाकीवरून जाताना मोबाईल कानाला लावून एका हाताने वाहन चालविणारे तरुण, तसेच एका हाताने मोबाईल आणि दुसऱ्या हाताने स्टेअरिंग सांभाळणारे चारचाकी चालक रस्त्यावर दिसतात.

विशेषतः शाळा-महाविद्यालय परिसरात विद्यार्थी आणि तरुणांकडून होणारे असे प्रकार चिंताजनक आहेत. मोबाईलवरील संभाषणात लक्ष गुंतल्याने समोरील वाहने, पादचारी आणि रस्त्यावरील अडथळ्यांकडे दुर्लक्ष होण्याची शक्यता असते. एका क्षणाची चूकही गंभीर अपघाताला कारणीभूत ठरू शकते.

वाहतूक पोलिस नियमभंग करणाऱ्यांवर कारवाई करतात. मात्र काही वाहन चालकांवर त्याचा परिणाम होत नसल्याचे दिसते. दंडाची भीती नसल्याप्रमाणे नियम धाब्यावर बसविले जात आहेत. त्यामुळे अशा वाहन चालकांवर कठोर कारवाई करण्याबरोबरच वर्दळीच्या ठिकाणी नियमित तपासणी करावी, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT