कराड : तासवडे ता. कराड एमआयडीसीत शेतीचे खते बनवण्याचा बहाणा करणाऱ्या सुर्यप्रभा फॉर्माकेम कंपनीतून ६ कोटी ३५ लाखांचे कोकेन तळबीड पोलीसांनी जप्त केले. जप्त केलेले कोकेन १ किलो २७० ग्रॅम असून याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा दाखल केला आहे. संशयित आरोपींवर तेलंगणा राज्य व श्रीरामपूर पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. सातारा जिल्ह्यातील हायप्रोफाईल अंमली पदार्थाचा पर्दाफाश झाल्याने अनेकांचे धाबे दणाणले आहेत.
यामध्ये अमरसिंह जयवंत देशमुख (रा. नांदगाव), समीर सुधाकर पडवळ (रा. वृंदावन सिटी मलकापूर कराड), रमेश शंकर पाटील (रा. मल्हारपेठ ता. पाटण), जीवन चंद्रकांत चव्हाण (रा. आवर्डे ता. पाटण), विश्वनाथ शिपणकर (रा. दौंड जि.पुणे) यांच्याविरुद्ध अंमली औषधी द्रव्य अधिनियम १९८५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील अमरसिंह देशमुख हा मुख्य आरोपी असून तो कंपनीचा मालक आहे. अंमली पदार्थ प्रकरणी त्याला तेलंगणा पोलिसांनी अटक केली आहे. विश्वनाथ शिपणकर हा पसार झाला आहे.
याबाबतची माहिती नुतन पोलिस अधीक्षक तुषार दोशी यांनी दिली. ते म्हणाले, तळबीड पोलीस तासवडे एमआयडीसी कंपनीतील प्लॉट नंबर बी. ५६ येथे पेट्रोलिंग करत होते. यावेळी सुरक्षितता व नियमावलीनुसार कामकाज होत नसल्याबाबत माहीती मिळाली. तळबीड पोलिसांना संशय बळावल्याने सपोनि किरण भोसले यांनी पथकासह बी ५६ मधील सूर्यप्रभा कंपनीत पाहणी केली. तेथील संशयित पदार्थ असल्याचे लक्षात आले. या कंपनीत शेतीसाठी लागणारे औषधे तयार केले जातात असे सांगितले गेले.
मात्र संबंधित कंपनीत संशयास्पद वस्तू असल्याची खात्री झाल्यानंतर सपोनि किरण भोसले यांनी पथकासमवेत कंपनीत जाऊन तपासणी व पंचनामा केला. यावेळी तेथे फिनिक्स ऍसिटिक ऍसिड असल्याचे सांगण्यात आले. कपाटात प्लास्टिकच्या चार पिशव्याची पाहणी केली असता त्यामध्ये स्फटिक सारखा पदार्थ आढळून आला. या संदर्भात पोलिसांनी विचारणा केली असता त्यांनी उडवा उडवीची उत्तर दिली. संबंधित कपाटात पांढरा पिवळसर रंगाचा स्पटिक सारखा पदार्थ आढळून आल्याने पोलीसांनी ताब्यात घेवून चौकशी केला असता ते कोकेन असल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. त्याचे वजन १३७० ग्रॅम असून सदरचे कोकेन ६ कोटी ३५ लाखाचे असल्याचे पोलीसांनी सांगितले.
ही कारवाई पोलिस अधीक्षक तुषार दोशी, अपर पोलिस अधीक्षक डॉ.वैशाली कडूकर, डीवायएसपी अमोल ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि किरण भोसले, अमित बाबर, फौजदार साक्षात्कार पाटील, सतिश आंदेलवार, काळे, पोलिस शशिकांत खराडे, शहाजी पाटील, योगेश भोसले, आनंदा रजपूत, गोरखनाथ साळुंखे, निलेश विभुते, अभय मोरे यांनी कारवाईत सहभाग घेतला.