Goa Crime News | गोव्याला ड्रग्जचा विळखा, कॉफी, चॉकलेटच्या पाकिटातून कोकेन, कुणाचा किती टक्का?

या तस्करीत परदेशी, परप्रांतीय आणि गोमंतकीय यांचा मोठा वाटा
 Goa Drug Arrests
Goa Drugs(File Photo)
Published on
Updated on
प्रभाकर धुरी, पणजी
Summary

Goa Crime News

'धंद्यात रिस्क जितकी जास्त, तितकी कमाई अधिक' हे गणित ड्रग्ज व्यवसायाला तंतोतंत लागू पडते. कमीत कमी वेळेत जास्त पैसा मिळत असल्याने अमली पदार्थाच्या व्यापारात अनेकजण यायला इच्छुक असतात. यात अब्जावधी रुपयांची उलाढाल होते आणि सहजपणे लाखोंची कमाई होते म्हणून अमली पदार्थाचे मायाजाल अनेकांना आकर्षित करत आहे. त्यातूनच गोव्याभोवती पडलेला ड्रग्जचा विळखा दिवसेंदिवस घट्ट होतो आहे...

गोवा हे आंतरराष्ट्रीय पर्यटनस्थळ. साधारणपणे ऑक्टोबरमध्ये पर्यटन हंगाम सुरू होतो आणि पर्यटकांचा गोव्यात पूर येतो. त्यातील काहीजण ड्रग्जचा व्यवसाय करण्यासाठी येतात तर काहीजण ड्रग्ज सेवनासाठी. या तस्करीत परदेशी, परप्रांतीय आणि गोमंतकीय यांचा वाटा मोठा आहे. यातील चक्रावणारे सत्य हे आहे की, गोव्यातून ड्रग्ज आणि ड्रग्ज पेडलर यांना हद्दपार करणे खूपच कठीण आहे. कारण एकाला अटक केली आणि तुरुंगात पाठवले की, दुसरा तयार होतो. त्यांची एक अखंड साखळी तयार होते, जी गोव्याच्या संस्कृतीला विळखा घालून बसली आहे.

राज्यात दरवर्षी सरासरी दीडशे ड्रग्जचे गुन्हे दाखल होतात. क्राईम ब्रँचने महिनाभरापूर्वी बंगळूर येथील एका व्यक्तीकडून ११ कोटी रुपयांचा हायड्रोपॉनिक गांजा जप्त केला होता. तेव्हाची ती सर्वात मोठी कारवाई होती. महिना सव्वा महिन्यात तब्बल ४३.२० कोटी रुपयांचे ४.३२ किलो कोकेन चिचोळणा मुरगाव येथे जप्त करण्यात आले. ही त्यानंतरची सर्वात मोठी कारवाई ठरली होती. पुढच्या सातच दिवसांत गोवा पोलिसांच्या अमली पदार्थ विरोधी सेलने (एएनसी) शिवोली येथे छापा टाकून ११०.७२ डॉम एलएसडी ड्रग्ज जप्त केले, ज्याची आंतरराष्ट्रीय बाजारातील किंमत ११.०७ कोटी रुपये एवढी आहे. याप्रकरणी अटक केलेला मूळ पलक्कड, केरळ येथील मोहम्मद समीर (२९) गेल्या पाच वर्षांपासून गोव्यात राहात होता आणि गेस्ट हाऊस चालवत होता. शिवाय स्वतंत्र घर भाड्याने घेऊन तो ड्रग्जचा व्यवसाय चालवत होता.

 Goa Drug Arrests
Goa Drug Case | २१ ड्रग्ज तस्करांचा तपास सुरू, पोलीस हालचालींना वेग

थेंबात विकला जाणारा एलएसडी !

एएनसीने जप्त केलेल्या एलएसडी द्रावणाचे प्रमाण अंदाजे १० ते १२ लाख एलएसडी ब्लॉटस् किंवा एलएसडी पेपर्स तयार करण्यासाठी पुरेसे आहे. या एका ब्लॉटची किंवा एलएसडी पेपरची किंमत ३ ते ५ हजार रुपये आहे. हा ड्रग्ज थेंबात विकला जातो आणि आवश्यकतेनुसार त्याच्या ग्राहकांना द्रव आणि ब्लॉटिंग पेपर्स पुरवला जातो. एलएसडी लिक्विड सायकेडेलिक ड्रग्जचा वापर सायट्रान्स पार्टी सर्कलमध्ये मोठ्या प्रमाणावर केला जातो आणि तो जगातील सर्वात शक्तिशाली अमली पदार्थांपैकी एक मानला जातो.

 Goa Drug Arrests
Goa Drug Case : गोव्यात अमली पदार्थ प्रकरणी रशियन ऑलिम्पिकपटूला अटक; रशियाचा माजी पोलीसही अटकेत

कॉफी आणि चॉकलेटच्या पाकिटातून कोकेन!

चिकोळणा येथे जप्त केलेले ४३.२० कोटींचे कोकेन चॉकलेट आणि कॉफीच्या पाकिटात लपवून आणले होते. विशेष म्हणजे बायणा, वास्को येथे राहणारी मुख्य संशयित रेश्मा वाडेकर हिने थायलंडमधून हे ड्रग्ज प्रथम दिल्लीत व तेथून गोव्यात आणले होते. हे ड्रग्ज वितरित करण्यासाठी तिला स्मशानभूमीत मृतदेहाची विल्हेवाट लावणारा तिचा पती मंगेश वाडकर व निबू व्हिन्सेंट (४५, मूळ कोलकाता) मदत करणार होते. रेश्मा हिला यापूर्वी वेश्याव्यवसाय प्रकरणात अटक झालेली आहे. मात्र डोळे दिपवणारा पैसा या धंद्यात असल्याने दिमतीला वकील घेऊन ती ड्रग्ज व्यवसायात उतरली आहे.

 Goa Drug Arrests
Drugs Seized In Goa : गोव्यात २५ लाखांचे ड्रग्ज जप्त; हणजूण येथे एनसीबीची कारवाई

कुणाचा किती टक्का !

. एएनसीने एक जानेवारी २०२० ते २८ फेब्रुवारी २०२५ या कालावधीत ७६२ गुन्हे दाखल करून ८९५ जणांना अटक केली आहे. यात २५३ (२८.२६ टक्के) गोमंतकीय आहेत, ५०५ (५६.४२ टक्के) परप्रांतीय, तर १३७ (१५.३० टक्के) विदेशी नागरिकांचा समावेश आहे. २०२४ मध्ये राज्यात विविध पोलिसांनी १६२ गुन्हे दाखल करून १९० जणांना अटक केली आहे. त्यातील सर्वाधिक ५५ (२८.९४ टक्के) गोमंतकीय आहेत, १११ (५८.४२ टक्के) परप्रांतीय, तर फक्त २४ (१२.६३ टक्के) विदेशी नागरिकांचा समावेश आहे.

११२ दिवसांत ६६ कोटींचे ड्रग्ज जप्त!

एक जानेवारी २०२५ ते २२ एप्रिल २०२५ या काळात (११२ दिवसांत) ९ प्रकरणांमध्ये तब्बल ६६.३४ कोटींचे १९.३४७५ किलो ड्रग्ज जप्त करण्यात आले. २०२४ मध्ये वर्षभरात उत्तर व दक्षिण गोव्याचे पोलिस, अमली पदार्थ विरोधी विभाग आणि क्राईम ब्रँचने मिळून १० कोटी रुपयांचे ड्रग्ज जप्त केले होते. २०२५ मधील सुरुवातीच्या जवळपास चार महिन्यांतील ड्रग्ज जप्तीचा आकडा गोवा दिवसेंदिवस ड्रग्जच्या विळख्यात जखडला जातोय याची साक्ष देत आहे.

गोव्यात का फोफावला हा व्यवसाय?

गोव्यात हा व्यवसाय फोफावायला अनेक गोष्टी कारणीभूत आहेत. वेगवेगळ्या प्रकारच्या अमली पदार्थाची लागवड गोव्यात गुपचूप करण्यात येते. त्यात विदेशी आणि गोमंतकीयांचा सहभाग आढळला आहे. याव्यतिरिक्त डिजिटल युगात डार्क नेट, व्हॉटस्अप, टेलिग्राम या सोशल मीडियाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात ड्रग्जची तस्करी सुरू आहे. त्यामुळे स्थानिक यंत्रणेला ड्रग्ज तस्करांना पकडण्यात अडचणी येत आहेत. यासाठी केंद्रीय यंत्रणांची मदत घेण्याची आवश्यकता आहे. ड्रग्ज व्यवसायाच्या विस्ताराची व्याप्ती पाहता गोव्याचाही 'उडता पंजाब' झाला असून ड्रग्जची पाळेमुळे केवळ किनारी भागातच नाहीत, तर खेड्यापाड्यात सुद्धा पसरलेली आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news