वाई येथे सांगता सभेत बोलताना ना. जयकुमार गोरे, व्यासपीठावर धैर्यशील कदम, मदनदादा भोसले, सुरभि भोसले, अनिल सावंत व उमेदवार.  Pudhari Photo
सातारा

Political Controversy Satara News | आबा, भाजपमुळेच तुम्ही दिव्याच्या गाडीत

ना. जयकुमार गोरे : यशवंतरावांच्या विचारांचा एकतरी अंश तुमच्यात आहे का?

पुढारी वृत्तसेवा

वेलंग : वाईकरांनी मंत्र्यांच्या पायात साखळदंड बांधला अन् शहराबाहेर जावून दिले नाही. मी मंत्री झाल्यानंतर 29 नगरपालिकांमध्ये सभा घेतल्या. मी कधीतरी वाट बघत होतो की ते कधीतरी कुठल्या पालिकेसाठी सभा घेतील, बाहेर जातील. पाचगणीला ते फिरायला जातात. त्यांना बाहेर जावू देत नाही ही ताकत तुमची आहे.

ज्या लाल दिव्याच्या गाडीत बसलाय तो दिवा भाजपने दिला आहे. कुणाला यशवंतरावांचे विचार समजवता, कुणाला शिकवता? यशवंतराव चव्हाण यांच्या विचारांचा एक तरी अंश आहे का तुमच्यात?, अशा शब्दात ग्रामविकास मंत्री ना. जयकुमार गोरे यांनी मदत व पुनर्वसन मंत्री ना. मकरंद पाटील यांच्यावर टिकास्त्र सोडले.

वाई नगरपालिका निवडणुकीसाठी भाजप उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित सांगता सभेत ते बोलत होते. यावेळी माजी आमदार मदनदादा भोसले, डॉ. सुरभी भोसले, धैर्यशील कदम, अनिल सावंत, अशोक गायकवाड, डॉ. प्रतिभा शिंदे, अविनाश फरांदे, सरिता सावंत, स्वप्निल गायकवाड, चिन्मय कुलकर्णी, विजय ढेकाणे यांसह भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ना. जयकुमार गोरे म्हणाले, सर्व सत्ता तुमच्याकडे आहेत. सरपंच, जि.प. सदस्य, जिल्हा बँक संचालक, चेअरमन, कारखान चेअरमन, खासदारकी, आमदारकी, मंत्रिपद हे सगळ असताना वाई शहर तुमच्यावर खूश का नाही. का वाईकरांना वाटते अजून विकास नाही. पर्यटन क्षेत्र का अजून मोठे होत नाही, याला कोण जबाबदार आहे? याचा दोष मदनदादांना देणार की जयकुमारला देणार? अशी व्यवस्था करा की वाई मला बोलवणार नाही.

तुम्ही आदर्श घालून दिला म्हणून त्यांनी पक्ष दिला. सकाळी एका पक्षात अन् संध्याकाळी एका पक्षात होता. कार्यकर्त्यांची फळी निर्माण केली मग उमेदवार तुम्हा का उसना घ्यावा लागला? मी जे सांगतोय ते पाच वर्षात नाही झाले तर वाईत पाय ठेवणार नाही. जी विकासकामे सांगतोय ती भाजपची आमची टीम करेल, अशी ग्वाही ना. गोरे यांनी दिली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाराणसीचा विकास केला; त्याच धर्तीवर वाई-दक्षिण काशीचा विकास करण्याची वेळ आली आहे. वाईचा नगराध्यक्ष भाजपाचा झाल्यास तीन महिन्यांत ‘ब’ वर्ग पर्यटन क्षेत्राचा दर्जा मंजूर करून देऊ, असेही ते म्हणाले.

मी महत्त्वाकांक्षी होतो ते फक्त विकासासाठीच. महाबळेश्वर-पाचगणीला येणारे 10 टक्के पर्यटकही वाईत येत नाहीत. कोणत्याही सुविधा नसल्यानेच ही परिस्थिती ओढवली आहे. विरोधकांनी जाणूनबुजून माझे पाय खेचले; अडथळे निर्माण केले, असे अनिल सावंत म्हणाले.

दर्जाहिन लोकप्रतिनिधींमुळे नगरपालिका ‘क’ वर्गात : मदनदादा भोसले

मदनदादा भोसले म्हणाले, गेल्या 15 वर्षांत दाखवण्यासारखे एकही काम नाही. नगरपालिका ‘क’ वर्गात असण्याचे कारण म्हणजे लोकप्रतिनिधी दर्जाहीन आहेत. कारखान्याचे 450 कोटींचे कर्ज दोन्ही भावांनी वाढवले; हा विकास नव्हे, राजकारण आहे, अशी टीका त्यांनी केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT