

सातारा : ज्यांनी लोकसभेच्या निवडणुका एकत्र लढल्या, ज्यांनी काही ठिकाणी विधानसभेलाही एकत्र निवडणुका लढवल्या तेच नगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये एकमेकांच्या विरोधात ऊर फाटेपर्यंत ओरडत आहेत. कालचे शत्रू अचानकपणे मित्र होऊन एकमेकांच्या मांडीला मांडी लावत आहेत. सातारा जिल्ह्याच्या राजकारणाची नगरपालिकांच्या निवडणुकीत पूर्ण मोडतोड झाली असून राजकीय नैतिकतेचे धिंडवडे निघून नवी समीकरणे आकाराला आणली जात आहेत.
सातारा जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीत भाजप, शिवसेना शिंदे गट व राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट एकत्र होते. विधानसभेच्या निवडणुकीतही बहुतांश ठिकाणी सातारा जिल्ह्यात अशीच परिस्थिती होती. महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशाच लढाया लोकसभा व विधानसभेला झाल्या. महायुतीने तर महाविकास आघाडीच्या विरोधात एकत्र येऊन जोरदार प्रचार मोहिमा राबवत मविआच्या नेत्यांवर एकत्रित तोंडसुख घेतले होते. विधानसभेच्या निवडणुकीनंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची तयारी करताना भाजपने अनेक ठिकाणी महायुतीतील मित्र पक्षाच्या नेत्याचा शत्रूच आपल्या पक्षात घेऊन भाजप मजबूत करण्याचा प्लॅन केला.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटानेही काँग्रेस व शरद पवार गटातील नेत्यांना आपल्या पक्षात घेऊन पक्ष मजबूत करण्याची खेळी केली. त्यामुळे नगरपालिका निवडणुकांपूर्वी एकमेकांच्या कार्यक्षेत्रात घुसखोरी करत भाजप व राष्ट्रवादी काँग्रेसमधील मंत्री एकमेकांवर यथेच्छ तोंडसुख घेत होते. विशेषत: ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांच्यात चांगलीच जुंपली होती. हेच मतभेद त्यांनी नगरपालिकेच्या निवडणुकीतही पुढे नेले आहेत. मकरंद पाटील यांच्या वाई नगरपालिकेत जयकुमार गोरे यांनी लक्ष घातले आहे, तर जयकुमार गोरे यांचा इलाका असलेल्या म्हसवड व रहिमतपूर नगरपालिकेत मकरंद पाटील, खा. नितीन पाटील यांनी लक्ष घातले आहे. दोघांचेही एकमेकांविरोधात वाक्युद्ध सुरू आहे. त्यामुळे महायुतीतच तणाव निर्माण झाला आहे. कराड नगरपालिकेत भाजप नेते डॉ. अतुल भोसले व शिवसेनेचे राजेंद्र यादव विधानसभेला एकत्र होते.
आता दोघांची एकमेकांविरोधात पॅनल पडली आहेत. विशेष म्हणजे यादवांच्या प्रचाराला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आल्यानंतर आता भोसलेंसाठी पावसकरांच्या प्रचाराला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस येत आहेत. लोकसभेला, विधानसभेला बाळासाहेब पाटील एकनाथ शिंदे यांच्या विरोधात होते. कालच्या कराडच्या सभेत एकनाथ शिंदे व बाळासाहेब पाटील एकत्र बसले होते. जिल्हा बँकेला बाळासाहेब पाटील व उदयसिंह उंडाळकर एकमेकांविरोधात लढले. कराड नगरपालिकेला दोघेही एकत्र आहेत. विधानसभेला मनोहर शिंदे हे पृथ्वीराज चव्हाण यांच्या सोबत होते. मलकापूर नगरपालिकेच्या निवडणुकीत मनोहर शिंदे हे भाजपनेते अतुल भोसले यांच्या मांडीला मांडी लावून बसत आहेत.
कराड उत्तरच्या विधानसभेच्या निवडणुकीत सुनील माने राष्ट्रवादी शरद पवार गटात तर वासुदेव माने शिवसेना शिंदे गटात होते. आता रहिमतपूर नगरपालिकेला दोघेही एकत्र आहेत. सुनील माने अजित पवार गटात असून या आघाडीच्या प्रचाराला शिवसेना नेते व पालकमंत्री शंभूराज देसाई जात आहेत. महाबळेश्वरात शिवसेना शिंदे गटाची लढाई राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाविरोधात आहे. तर रहिमतपुरात शिवसेना शिंदे गट व अजित पवार गट एकत्र आहेत. विशेष म्हणजे या दोन्ही नगरपालिका सातारा जिल्ह्यातच आहेत. सह्याद्री साखर कारखान्याच्या निवडणुकीत आ. मनोज घोरपडे व धैर्यशील कदम यांनी एकमेकांविरोधात कुस्ती केली. आता रहिमतपूर नगरपालिकेला दोघेही मांडीला मांडी लावून बसत आहेत. पाचगणीमध्ये पक्षीय झेंडे बासनात ठेवून अपक्ष एकमेकांविरोधात लढत आहेत. निवडणुकीनंतरच त्यांच्यातील जमाडी जंमत समोर येणार आहे.
लोकसभेला रामराजे ना. निंबाळकर तटस्थ होते परंतु त्यांचे सैन्य तुतारीवर होते. संजीवराजे ना. निंबाळकर, रघुनाथराजे ना. निंबाळकर यांनी धैर्यशील मोहिते-पाटील यांचा प्रचार केला होता. विधानसभेला राजे गट तुतारी सोबतच राहिला. त्यावेळीही रामराजे तटस्थ राहिले. दोन्ही वेळेला रामराजे व्यासपीठावर गेले नाहीत. फलटण नगरपालिकेच्या निवडणुकीत मात्र रामराजे व्यासपीठावर आले. राजेगटाने शिवसेना शिंदे गटात प्रवेश करुन धनुष्यबाण हातात घेतला आहे. लोकसभा - विधानसभेच्या निवडणुकीत एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेने रणजितसिंह नाईक निंबाळकरांना मदत केली होती. आता मात्र पालकमंत्री शंभूराज देसाई आणि रामराजे एकत्र बसलेले दिसले. दुसरीकडे लोकसभेला व विधानसभेला राजेगटासोबत असलेले कार्यकर्ते नगरपालिकेच्या निवडणुकीत रणजितसिंह ना. निंबाळकरांच्या व्यासपीठावर दिसत आहेत. दोन्ही गटात एकमेकांविरोधात हाणामाऱ्या केलेले एकमेकांच्या सोबत आहेत. तर एकमेकांसोबत असलेले एकमेकांविरोधात यथेच्छ बोलत आहेत.
एकंदर सातारा जिल्ह्यात एकमेकांच्या सोबत लोकसभा, विधानसभा लढलेले नेते व कार्यकर्ते नगरपालिकेच्या निवडणुकीत दुभंगले आहेत. जिल्हा परिषद, पंचायत समितींच्या निवडणुकीत आणखी मोडतोड होवून सातारा जिल्ह्याच्या राजकारणाचा पुरता ‘गोयंदा’ होणार आहे.