सातारा : विधानसभेची आचारसंहिता लागण्यापूर्वी मंत्रिमंडळाच्या बैठकीत धडाधड निर्णय घेतले जात आहेत; तर दुसर्या बाजूला रिझर्व्ह बँकेला पत्र देऊन आम्हाला सव्वा लाख कोटी रुपयांचे अतिरिक्त कर्ज द्या, अशी मागणी केली जात आहे. राज्याची परिस्थिती पाहता आठवड्याला 5 ते 6 हजार कोटी रुपर्य खर्च करायचे हा मतांसाठी महाराष्ट्र गहाण ठेवण्याचा कार्यक्रम चालू असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील यांनी सातार्यात पत्रकार परिषदेत केला. दरम्यान, 7 ते 8 दिवसांत आचारसंहिता लागेल. यामुळे द्यायचं नाही तर जाहीर करायला काय बिघडतंय, असा प्रकार महायुतीकडून सुरू असल्याची टीकाही त्यांनी केली.
मला माझी लाडकी खुर्ची पाहिजे, बाकी राज्याचे भवितव्य काय होतेय याच्याशी सत्ताधार्यांना काही देणंघेणं नाही, अशी मुख्यमंत्र्यांपासून सर्वांचीच प्रवृत्ती दिसत असल्याचे आ. जयंत पाटील म्हणाले. राज्यातील विधानसभा मतदारसंघांतील इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती पुणे येथे दि. 5, 6 व 7 ऑक्टोबर रोजी खा. शरद पवार व माझ्या उपस्थितीत घेतल्या जाणार आहेत. लोकसभेतील विजयानंतर मविआला जनतेतून चांगला प्रतिसाद आहे, असेही ते म्हणाले.
अजित पवार गटाचे कार्याध्यक्ष अमित कदम यांनी उमेदवारी मागितल्याच्या विषयावर विचारले असता आ. पाटील म्हणाले, अमित कदमांची इच्छा आहे असे मी ऐकले आहे; मात्र माझी आणि त्यांची भेट झालेली नाही. मात्र, इच्छा व्यक्त करणे काही गुन्हा नाही. शरद पवार गटाला सातार्यात किती जागा मिळतील? असे विचारले असता आ. पाटील म्हणाले, महाविकास आघाडीच्या मतदार संघाबाबत चर्चा चालू आहेत. चर्चा अंतिम झाल्यानंतर सांगितले जाईल. वाई व फलटण विधानसभा मतदारसंघात 2 ते 3 चेहरे इच्छूक आहेत. सातार्यात दोन्ही राजे एकत्र आले आहेत. लोकसभेला उदयनराजे निवडून आले आता पुढे काय? असे विचारले असता आ. पाटील यांनी मी आताच आलोय सातार्याचा अभ्यास करून सांगतो, असे ते म्हणाले.
जागा वाटपावरून छेडले असता आ. पाटील म्हणाले, महाविकास आघाडीमध्ये सध्या चर्चा सुरू आहे त्यामुळे संख्येवर बोलणे योग्य नाही. सातारा हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला टिकवून ठेवण्यासाठी व्यूहरचना सुरू असून लवकरच ते दिसेल. लोकसभेला ज्या ठिकाणी इच्छूक होते त्या ठिकाणी मताधिक्य घटलेले आहे. सातारा लोकसभेची जागा निवडून येईल याची आम्हाला खात्री होती. मात्र पिपाणीमुळे काही मतदारसंघात मते अपेक्षित पडलेली नाहीत. निवडणुकीच्या निकालावरून त्या ठिकाणी सुधारणा करणे सुरू असल्याचेही त्यांनी सागितले. यावेळी जिल्हाध्यक्ष सुनील माने, राजकुमार पाटील, सुधीर पवार यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. मदन भोसले यांची तुम्ही भेट घेतली असून ते पक्षात येण्यासाठी इच्छूक आहेत का? या प्रश्नावर आ. जयंत पाटील म्हणाले, मदन भोसले यांच्याबरोबर झालेल्या भेटीत पक्षप्रवेशासंदर्भात त्यांच्याशी कोणतीही चर्चा झाली नाही. त्यांच्याशी सदिच्छा भेट होती हे त्यावेळीही सांगितले आहे व आजही सांगत आहे.