सातारा : आज आपला देश एका संकटातून जात आहे. मात्र या संकटावर मात करण्याची ताकद देशातील सर्वसामान्य जनतेची आहे. जे काही घडतंय ते अस्वस्थ करणारं आहे. भारत हा दहशतवादाला प्रोत्साहन देणारा देश नाही. जे काही घडलं ते पाकिस्तानमुळे सुरू झालं आहे, असे ठाम मत व्यक्त करताना खा. शरद पवार यांनी युध्दाला पाकिस्तानच जबाबदार असल्याचे सुतोवाच केले. भारतीय सैन्यदलाच्या कामगिरीचा अभिमान वाटत असल्याचेही ते म्हणाले.
रयत शिक्षण संस्थेच्या पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या 66 व्या पुण्यतिथी कार्यक्रमात ते बोलत होते. खा. शरद पवार पुढे म्हणाले, सध्या उद्भवलेल्या संकटावर मात करण्याची ताकद या देशातील सर्वसामान्य जनतेची आहे. भारत कधीही अतिरेकी कारवाईचे समर्थन व अशा घटनांना प्रोत्साहन देत नाही. जे काही सुरू झालं ते अतिरेक्यांपासून सुरू झालं. शेजारच्या देशांनी दहशतवाद पोसला आहे. पाकिस्तानात अतिरेक्यांच्या अत्यंविधीला अधिकारी उपस्थित राहत आहेत.
यावरून अतिरेक्यांना कुणाची साथ लाभत आहे, हे दिसून येत आहे. आपण शांततेचा पुरस्कार करणारे लोक आहोत. मात्र, आपल्या देशाचे रक्षण करण्यासाठी योग्य कारवाया केल्या जात आहेत. सैन्यदलाची कामगिरी बघितल्यास अभिमान वाटतो म्हणून भारत हा यावेळी एकसंघ उभा राहिला पाहिजे, असेही खा. शरद पवार म्हणाले.
ते म्हणाले, मी संरक्षण खात्याचा मंत्री असताना दर सोमवारी सकाळी संरक्षण दलाच्या कार्यालयामध्ये तिन्ही दलाची बैठक घेतली जात होती. यावेळी देशाच्या सिमेवर काय घडतंय याचा आढावा तिन्ही दलाच्या प्रमुखांकडून घेतला जात होता. आज जगातील अन्य देशामध्ये महिला महत्चाच्या जबाबदार्या पार पाडताना दिसत आहेत. त्यावेळी मी महिलांना सैन्यात भरती करण्याबाबत प्रस्ताव ठेवला होता. पण तिन्ही दलाच्या प्रमुखांनी या गोष्टीला नकार दिला.
मी चौथ्या बैठकीत तिन्ही दलाच्या प्रमुखांना सांगितलं की, याबाबतचा निर्णय मी घेणार आहे. त्यानुसार भारताच्या सैन्य दलात महिलांना 9 टक्के आरक्षण दिलं. त्यानुसार सैन्य दलात महिलांना समाविष्ट करण्यास सुरूवात केली. सैन्यात आता आपल्या महिला देखील सहभागी होवून शत्रूशी दोन हात करत आहेत. सैन्यात जात, धर्म हा विचार कधीही केला जात नाही.