सातारा : पुढारी वृत्तसेवा
सह्याद्रीच्या कुशीत वसलेला, दुर्गप्रेमी आणि निसर्गप्रेमी पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्र असलेल्या ऐतिहासिक वासोटा किल्ल्याचा ट्रेक गुरुवार, दि. १५ ऑक्टोबरपासून सुरू झाला आहे. पावसाळ्यानंतर निसर्गरम्य वातावरणात वासोटा दुर्गभ्रमंतीचा आनंद लुटण्याची संधी पर्यटकांना मिळत आहे. घनदाट जंगल, उंचच उंच कडे, खोल दऱ्या आणि अर्थाग शिवसागर जलाशय अशा निसर्गवैभवाने नटलेल्या वासोटा किल्ल्याच्या भेटीसोबतच पर्यटकांना परिसरातील विविध पर्यटनस्थळांचाही आनंद घेता येणार आहे.
सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या गाभा क्षेत्रात असलेल्या वासोटा किल्ल्याला 'व्याघ्रगड' म्हणूनही ओळखले जाते. नैसर्गिक दुर्गमता आणि घनदाट जंगलामुळे या किल्ल्याला ऐतिहासिक महत्त्वाबरोबरच विशेष नैसर्गिक वैशिष्ट्य लाभले आहे. शिवसागर जलाशयातून बोटीने प्रवास करून आणि पुढे जंगलातून पायी ट्रेक करत किल्ल्यावर पोहोचावे लागते. त्यामुळे वासोटा भ्रमंती ही केवळ गडभेट नसून साहस, इतिहास आणि निसर्गाचा अनोखा संगम अनुभवण्याची पर्वणी ठरते.
सातारापासून सुमारे ४२ किलोमीटर अंतरावर असलेल्या बामणोली वनपरिक्षेत्रातून वासोटा किल्ल्याकडे जाण्यासाठी स्थानिक बोट क्लबच्या माध्यमातून बोटिंगची सुविधा उपलब्ध करुन देण्यात येते. मुनावळे, शेंबडी, आंबवडे आणि बामणोली या ठिकाणांहून बोटीने प्रवास करून पुढे जंगलातून ट्रेक करावा लागतो. शिवसागर जलाशयातील बोटिंग, सभोवताली पसरलेली सह्याद्रीची पर्वतरांग आणि घनदाट सदाहरित वनराई पर्यटकांना निसर्गाचा अविस्मरणीय अनुभव देतात. किल्ल्याच्या परिसरात उंच कडे आणि खोल दऱ्यांचे विहंगम दृश्य पाहायला मिळते.
जंगलातील जैवविविधता, शांत वातावरण आणि निसर्गाच्या सान्निध्यात घालवलेला वेळ पर्यटकांसाठी विशेष आकर्षण ठरणार आहे. वासोटा किल्ला भ्रमंतीसोबतच पर्यटकांना शेंबडी मठ, मुनावळे धबधबा, ठोसेघर धबधबा आणि जागतिक स्तरावर प्रसिद्ध असलेल्या कास पठाराला भेट देण्याचे नियोजन करता येणार आहे. त्यामुळे सातारा जिल्ह्यातील पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी वासोटा ट्रेक हा उत्तम पर्याय ठरू शकतो. सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्र संचालक तुषार चव्हाण यांनी वासोटा दुर्गपर्यटनासोबत परिसरातील निसर्गरम्य स्थळांचा आनंद घेण्याचे आवाहन केले आहे. ऐतिहासिक वारसा, साहसी भटकंती व निसर्गसौंदर्य यांचा संगम अनुभवण्यासाठी वासोटा किल्ला पर्यटकांना आकर्षित करणार आहे.
निसर्ग संवर्धनाची जबाबदारी पर्यटकांवर...
वासोटा किल्ला सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या संवेदनशील गाभा क्षेत्रात असल्याने पर्यटनादरम्यान वन्यजीव आणि पर्यावरणाचे संरक्षण करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. पर्यटकांनी निसर्ग मार्गदर्शकासोबतच भ्रमंती करणे आवश्यक आहे. वासोटा दुर्गपर्यटन मार्ग प्लास्टिकमुक्त क्षेत्र असून प्लास्टिकच्या वस्तूंवर पूर्णपणे बंदी आहे. तसेच सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्र शांतता क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले आहे. त्यामुळे पर्यटकांनी ध्वनिप्रदूषण टाळून, कचरा न करता आणि वन्यजीवांना त्रास न देता पर्यटनाचा आनंद घ्यावा.