Pratapgad Bhavanimata temple | नवरात्रौत्सव विशेष- शक्तिपीठ : प्रतापगडची भवानीमाता

प्रतापगड भवानीमाता नवरात्रौत्सव विशेष- शक्तिपीठ : प्रतापगडची भवानीमाता
प्रतापगडावरील भवानीमाता
प्रतापगडावरील भवानीमाताfile photo
Published on: 
Updated on: 

अभय हवालदार, किल्ले प्रतापगड

शिवछत्रपतींच्या गड-किल्ल्यांमध्ये प्रतापगडाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. स्वराज्यावर चालून आलेल्या अफजलखानाचा वध याच गडाच्या पायथ्याशी झाला. महाराष्ट्राची कुलस्वामिनी असलेल्या श्री तुळजाभवानी मातेचे मंदिर स्वराज्यात उभारण्याचा निर्णय छत्रपती शिवाजी महाराजांनी घेतला. त्यातून प्रतापगडावर एका महत्त्वाच्या शक्तिपीठाची स्थापना झाली. त्या काळात तुळजापूरचे देवीस्थान परकीय सत्तेच्या प्रदेशात असल्याने स्वराज्यातील भाविकांना देवीच्या दर्शनासाठी अडचणी येत होत्या. त्यामुळे महाराजांनी आपल्या आराध्य देवतेचे मंदिर स्वराज्यात उभारण्याचे ठरवले.

देवीची मूर्ती तयार करण्यासाठी महाराजांनी प्रथम तुळजापूर येथील मूर्तीची लहान प्रतिकृती बनवून घेतली. त्यानंतर मंबाजी नाईक पानसरे या अधिकाऱ्यासह विद्वान मंडळींना हिमालयाजवळील श्वेतगण्डकी आणि त्रिशूलगण्डकी नद्यांच्या संगमावरून मूर्तीसाठी शिळा आणण्याची जबाबदारी दिली. त्या काळात हा प्रदेश पर्वतचा राजा लीलासेन याच्या राज्यात होता. त्याच्या सहकार्याने उत्तम शाळिग्राम शिळा मिळवण्यात आली. या शिळेपासून तुळजापूरच्या भवानी मातेच्या मूळ प्रतिकृतीवरून सुमारे दोन फूट उंचीची सुंदर मूर्ती घडवण्यात आली. महिषासुरमर्दिनी रूपातील ही अष्टभुजा देवी असून, तिच्या मुकुटावर शिवलिंग, मस्तकाच्या उजवीकडे सूर्य आणि डावीकडे चंद्र कोरलेले आहेत. ही मूर्ती प्रथम राजगडावर आणण्यात आली. तेथे महाराजांनी दर्शन घेतल्यानंतर वाद्यांच्या गजरात समारंभपूर्वक प्रतापगडावर आणण्यात आली. जुलै १६६१ मध्ये नागपंचमीच्या दिवशी पंतप्रधान मोरोपंत पिंगळे यांच्या हस्ते विधिवत मूर्तीची प्रतिष्ठापना झाल्याची नोंद आढळते.

शिवाजी महाराजांनी प्रतापगडावर भवानी मातेची स्थापना केल्याचा उल्लेख सभासद बखरीत आढळतो. या बखरीत देवीने महाराजांना स्वराज्यात आपली स्थापना करून पूजाअर्चेची व्यवस्था करण्यास सांगितल्याचे वर्णन आहे. त्यानुसार महाराजांनी गण्डकी नदीतील शिळेपासून देवीची मूर्ती घडवून प्रतापगडावर प्रतिष्ठापना केली, दानधर्म केला आणि विविध अलंकार अर्पण केले, असे बखरीत नमूद आहे.

शिवचरित्राच्या अभ्यासासाठी महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या शिवभारत या समकालीन संस्कृत ग्रंथातही तुळजाभवानी प्रतापगडावर शिवाजी महाराजांच्या साहाय्यासाठी आल्याचा उल्लेख आहे. समर्थ रामदास स्वामींच्या वाङ्गयातही प्रतापगडावरील भवानी मातेचा संदर्भ आढळतो. जयराम पिंड्ये लिखित पर्णालपर्वतग्रहणाख्यान या ग्रंथात पन्हाळगडाकडे जाण्यापूर्वी शिवाजी महाराजांनी प्रतापगडावरील भवानी मातेचे दर्शन घेतल्याचा उल्लेख आहे. या संदर्भामधून प्रतापगडावरील भवानी मंदिराला तत्कालीन समाजजीवनात आणि स्वराज्याच्या धार्मिक-सांस्कृतिक परंपरेत महत्त्वाचे स्थान होते, हे स्पष्ट होते.

महाराजांनी केवळ मंदिर उभारले नाही, तर त्याच्या व्यवस्थापनासाठी स्वतंत्र संस्थानही निर्माण केले. मंदिराच्या नियमित पूजा-अर्चा, उत्सव आणि व्यवस्थापनासाठी हवालदार, मुजुमदार, पेशवे, फडणीस, पुजारी व सेवेकरी यांच्या नेमणुका करण्यात आल्या. यांपैकी अनेक नेमणुका वंशपरंपरेने चालत असत. मंबाजी नाईक पानसरे यांच्याकडे देवीच्या भोपेपणाच्या मुतालीकीचे प्रतिनिधित्व सोपवण्यात आले, तर नित्य पूजेसाठी विश्वनाथभट हडप यांची नेमणूक करण्यात आली. पालखीचे भोई, कीर्तनकार, पुराणिक, वादक, गोंधळी, माळी, सोनार, परीट पूजा, नैवेद्य, आरती आणि चौघडावादन होत असे. सायंकाळी मशालजी, शिंगाडे, स्थानिक रहिवासी आणि मानकरी देवीच्या दर्शनासाठी उपस्थित राहत. पौर्णिमेला गोंधळ आणि पालखीचा उत्सव साजरा केला जाई. कोजागिरी पौर्णिमा, त्रिपुरी पौर्णिमा, गणेश चतुर्थी, गोकुळाष्टमी आणि रामनवमी यांसारखे उत्सवही परंपरेनुसार होत असत.

नवरात्रौत्सवाला विशेष महत्त्व होते. आश्विन शुद्ध प्रतिपदेपासून विजयादशमीपर्यंत घटस्थापना, होमहवन, शतचंडी, त्रिकाळ पूजा, नैवेद्य, गोंधळ, कीर्तन आणि पुराण यांचे आयोजन केले जात असे. विजयादशमीच्या दिवशी देवीच्या पालखीची मिरवणूक अफझलखानाच्या कबरीपर्यंत नेली जात असल्याची नोंद आहे. काळानुसार या परंपरांमध्ये काही बदल झाले असले, तरी उत्सवांचे धार्मिक महत्त्व कायम राहिले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news