सातारा : नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची टप्प्याटप्प्यात अंमलबजावणी सुरू झाली आहे. त्यानुसार पुढील शैक्षणिक वर्षापासून राज्यातील मराठी व इंग्रजी माध्यमाच्या शाळांमधून पहिलीपासून हिंदी विषय सक्तीचा करण्यात येणार आहे. नुकतीच शालेय शिक्षण अभ्यासक्रम पुनर्ररचना करणार्या सुकानू समितीने या आराखड्याला अंतिम मंजुरी दिली असून त्यानुसार पाठ्यक्रम तयार करण्यात येणार आहे. त्यामुळे यापूर्वी पाचवीपासून शिकवल्या जाणार्या हिंदी भाषेचा लळा पुढील शैक्षणिक वर्षात पहिलीपासूनच विद्यार्थ्यांना लागणार आहे.
केंद्र सरकारने मराठीला अभिजात भाषेचा दर्जा दिल्याचा राज्यभरात जल्लोष करण्यात आला. मात्र आता राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार अंतिम करण्यात आलेल्या राज्याच्या शालेय अभ्यासक्रम आराखड्यात मराटी व इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये पहिलीपासून हिंदी विषय सक्तीचा करण्यात येणार आहे. राज्यातील शालेय शिक्षणाच्या अभ्यासक्रम आराखडा तयार करण्यात आला आहे. सुकाणू समितीने या आराखड्याला नुकतीच अंतिम मंजुरी दिली असल्याने तसा पाठ्यपुस्तक अभ्यासक्रम तयार करण्यात येणार आहे. त्यानुसार राज्यातील सर्व मराठी व इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये पहिलीपासून हिंदी भाषा शिकवली जाण्याची रशक्यता आहे. त्यामुळे 6 ते 7 वर्षांच्या चिमुकल्यांना हिंदीचे धडे गिरवावे लागणार आहेत. कार्टून सीरियलमधील व्यक्तिरेखांचे काही संवाद चिमुकल्यांना तोंडपाठ असतातच, पण कार्टून न पाहणार्या मुलांनाही पाठ्यक्रमामुळे हिंदीचा लळा पहिलीपासूनच लागणार आहे.
अकरावी व बारावीत विज्ञान व गणित विषयाचा अभ्यासक्रम इंग्रजीतून असल्याने इंग्रजी माध्यमातील मुलांना ते सोपे जाते. मात्र मराठी माध्यमातील मुलांना पहिले वर्ष समजून घेण्यातच जाते. या पार्श्वभूमीतून मराठी माध्यमांतील शाळांमध्ये पहिले, पाचवी, आठवी अशा या टप्प्यांवर सेमी इंग्रजी माध्यम असून यामध्ये गणित व विज्ञान इंग्रजीतून असते. मात्र आता पहिलीपासून हिंदी सक्तीचे केल्यास सेमीच्या मुलांना मराठी, इंग्रजी व हिंदी अशा तीन भाषा अभ्यासाव्या लागणार आहेत.