अकोला : जिल्ह्यातील तेल्हारा तालुक्यातील तळेगाव डवला येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शासनाकडून पुरवठा होत असलेल्या शालेय पोषण आहारातील मसाल्याच्या पॅकबंद पाकिटात मेलेली पाल आढळून आली. हा प्रकार 29 ऑगस्ट रोजी मदतनीस व इतर कर्मचाऱ्यांच्या लक्षात आला. त्यामुळे ७६ विद्यार्थ्यांच्या संदर्भातील विषबाधेची घटना टळली आहे.
या प्रकरणी प .स गटशिक्षणाधिकारी यांनी भेट देत घटनेचा पंचनामा पालक व ग्रामस्थांसमक्ष करीत वरिष्ठांकडे अहवाल पाठविला आहे. प्राप्त माहितीनुसार, या शाळेत शासनाकडून १२ जुलै रोजी शालेय पोषण आहाराचा पुरवठा करण्यात आला होता. २९ ऑगस्ट रोजी विद्यार्थ्यांसाठी शालेय पोषण आहार शिजविणे सुरू असताना मदतनीस व स्वयंपाकी यांनी मसाला पेस्टचे पॅकबंद पॉकिट फोडले असता त्यात मेलेली पाल आढळून आली. त्यांनी लगेच याबाबत प्रभारी मुख्याध्यापक यांना सांगितले. त्यानंतर गटशिक्षणाधिकारी यांनी पंचनामा केला. तसेच सर्व साहित्य जप्त करून नेण्यात आले. या पंचनाम्याचा लेखी अहवाल वरिष्ठांना सादर करण्यात आला आहे.
तळेगाव डवला येथील शाळेतील पोषण आहाराच्या मसाल्यात मृत पाल आढळली. या प्रकाराचा जि प सभेत सदस्यांनी संताप व्यक्त करीत कारवाईसाठी विषबाधेची प्रतीक्षा करण्यात येत आहे काय; असा सवाल उपस्थित केला. दरम्यान पुरवठादाराला कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली असल्याचे शिक्षणाधिकारी प्राथमिक रतन पवार यांनी जि प च्या सभेत सांगितले.