सातारा : पुढारी वृत्तसेवा
प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयाने दुचाकी वाहन चालवताना हेल्मेट बंधनकारक केले आहे. अल्पवयीन मुलाने वाहन चालवण्याचा अपराध केला तर मोटार वाहन कायद्यांतर्गत त्याच्या पालक अथवा वाहन मालकास दोषी धरून त्यांना 3 वर्षाचा तुरूंगवास व 25 हजार दंडात्मक कारवाईचा बडगा उगारण्यात येणार आहे. आरटीओची नवी नियमावली आता अंमलात आणली जात असल्याने वाहनधारकांना कारवाईला सामोरे जावे लागणार आहे.
सातारा जिल्ह्यात सन 2023-24 मध्ये घडलेल्या अपघातांचे तुलनात्मक विश्लेषण केले असता या वर्षामध्ये घडलेल्या एकूण रस्ते अपघातांमध्ये दुचाकी व पादचार्यांचे प्रमाण सर्वाधिक असल्याचे दिसून येत आहे. अपघातापैकी 70 ते 80 टक्के अपघात हे फक्त दुचाकीचे आहेत. ही बाब रस्ता सुरक्षेच्या दृष्टीकोनातून अतिशय चिंताजनक आहे. वाहन चालवताना हेल्मेटचा वापर करणे हे रस्ता सुरक्षेच्या दृष्टीकोनातून अत्यंत महत्वाचे आहे. दुचाकी वाहनाच्या अपघातामध्ये जखमी होणारे अथवा मृत पावणारे वाहनस्वार हे हेल्मेटशिवाय प्रवास करताना दिसून आले आहेत. त्यामुळे हेल्मेट वापरण्यासंबंधी प्रबोधनात्मक व अंमलबजावणी विषयक व्यापक मोहीम सातारा जिल्ह्यात राबवण्यात येत आहे. त्यासाठी प्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षणाधिकार्यांना पत्रव्यवहार केला आहे.
दुचाकी वाहन चालवताना वाहनधारकाने तरतुदीचा भंग केल्यास 1 हजार रुपये दंड आकारण्यात येणार आहे. तसेच त्याचे लायसन तीन महिने अपात्र करण्यात येणार आहे. तसेच अल्पवयीन मुलाने वाहन चालवण्याचा अपराध केल्यास मोटार वाहन कायद्यांतर्गत संबंधित वाहनाचा 12 महिन्यासाठी परवाना रद्द केला जाणार आहे. प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या वायूवेग पथकामार्फत ठिकठिकाणी वाहनांची तपासणी केली जात आहे. तसेच सर्व माध्यमिक शाळा व महाविद्यालयामध्ये हेल्मेट वापराबाबत तसेच अल्पवयीन मुलांना वाहन वापरण्यापासून परावृत्त करण्याबाबत जनजागृती करावी. जेणेकरुन मोटार वाहन कायद्यातील तरतुदींचे पालन होवून अपघात कमी होण्यास मदत होणार आहे.
आरटीओच्या वायूवेग पथकाला शाळा, महाविद्यालय परिसरात अल्पवयीन मुले, अती वेगाने वाहन चालवणे, ट्रिपल सीट, विना हेल्मेट विद्यार्थी सापडल्यास त्यांच्यावर गुन्हे दाखल केले जाणार आहेत. पालकांनी अल्पवयीन विद्यार्थ्यांना वाहन चालवण्यास देऊ नये.- दशरथ वाघुले, प्रादेशिक परिवहन अधिकारी, सातारा