मेढा : जावली तालुक्यात पुन्हा एकदा माजी आमदार सदाभाऊ सपकाळ व वसंतराव मानकुमरे यांची जोडी राजकीय मैदानावर दिसेल, अशी भूमिका वसंतराव मानकुमरे यांनी एका कार्यक्रमात मांडल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या. सदाभाऊ सपकाळ हे भाजपच्या वाटेवर असल्याचे संकेतच मानकुमरे यांनी दिले.
करंजे येथे एका खासगी कार्यक्रामात जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष वसंतराव मानकुमरे यांनी केलेल्या वक्तव्याने जावलीतील वातावरण ढवळले आहे. या कार्यक्रमास माजी आमदार सदाशिव सपकाळ, माजी उपनगराध्यक्ष दत्ता पवार, माजी जि.प.सदस्य मच्छिंद्र क्षीरसागर, अजिंक्यतारा कारखान्याचे उपाध्यक्ष नामदेव सावंत, जावलीचे गटशिक्षणाधिकारी संजय धुमाळ आदी मान्यवर उपस्थित होते.
मानकुमरे यांनी सदाशिव सपकाळ यांचा संदर्भ देत सांगितले की, आम्ही अजून राजकारणातून निवृत्ती घेतली नाही. पुन्हा नव्या उमेदीने जोरदार झेप घेऊन बंड करून आमची राम-लक्ष्मणाची जोडी तालुक्यात राजकीय पटलावर वेगळ्या पद्धतीने दिसेल. फक्त शिवेंद्रराजे यांना सोडून आम्ही कुठेही जाणार नाही, असे सांगून सदाभाऊ भाजपमध्ये पक्षप्रवेश करणार असल्याचे संकेतच मानकुमरे यांनी दिले. 1995 - 96 च्या काळात मानकुमरे व सदाभाऊ सपकाळ यांनी शिवसेनेच्या माध्यमातून तालुक्यातील प्रत्येक गाव व वाडी वस्ती भगवेमय केली होती. आता पुन्हा ही जोडी एकत्र दिसण्याची चिन्हे आहेत. जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकी अगोदर जावलीत राजकीय भूकंप पाहायला मिळतो काय, याची उत्सुकता आहे.