गुजरात येथील जीएसटी आयुक्त चंद्रकांत वळवी पत्नीसह सुनावणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयात उपस्थित राहिले.  Pudhari Photo
सातारा

सुनावणीसाठी जीएसटी आयुक्त वळवी अखेर हजर

झाडाणी प्रकरणाची 11 जुलैला पुन्हा सुनावणी

पुढारी वृत्तसेवा

सातारा : पुढारी वृत्तसेवा : झाडाणी (ता. महाबळेश्वर) येथील जमीन खरेदी प्रकरणात कमाल जमीन धारण कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुजरात येथील जीएसटी आयुक्त चंद्रकांत वळवी बुधवारी सुनावणीसाठी हजर झाले. मात्र, अतिरिक्त जिल्हाधिकारी जीवन गलांडे यांना मुंबईत तातडीच्या बैठकीसाठी जावे लागल्याने झाडाणी प्रकरणी पुढील सुनावणी 11 जुलैला सकाळी 11 वाजता होणार आहे. झाडाणी (ता. महाबळेश्वर) येथे आयुक्त चंद्रकांत वळवी व त्यांचे नातेवाईक तसेच मित्र मंडळींनी सुमारे 640 भूखंड खरेदी करून त्याठिकाणी बेकायदा बांधकाम, अनधिकृत उत्खनन तसेच वन व वन्यजीव कायद्याचे उल्लंघन केल्याची तक्रार जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्याकडे सामाजिक कार्यकर्ते सुशांत मोरे यांनी केली आहे. जिल्हाधिकार्‍यांनी याप्रकरणी सखोल चौकशीचे आदेश देत अहवाल मागवला होता.

प्रशासनाने केलेल्या चौकशीत झाडाणी येथे जमीन खरेदीत आयुक्त चंद्रकांत वळवी, पियुष बोंगीरवार, अनिल वसावे यांच्याकडून कमाल जमीन धारण कायद्याचे उल्लंघन झाल्याचे आढळले. तसेच संबंधित जमिनीवर अनधिकृत बांधकाम केल्याचेही निष्पन्न झाले. इतर प्रकरणात अद्याप चौकशी सुरू असली तरी कमाल जमीन धारण कायद्यांतर्गत अतिरिक्त जिल्हाधिकारी जीवन गलांडे यांनी तिघांसह इतर आठ जणांना नोटीस काढून सुनावणीला उपस्थित राहण्याचे आदेश दिले.

पहिल्या दोन तारखांना वळवी यांनी उपस्थित न राहता वकीलांमार्फत सुनावणीचे कामकाज चालवण्याचा प्रयत्न केला. मात्र, अतिरिक्त जीवन गलांडे यांनी वळवींसह तिघांनाही समक्ष हजर राहण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार बुधवारी सकाळी 11 वाजता सुनावणीचे कामकाज सुरू झाले. यावेळी तक्रारदार सुशांत मोरे तसेच चंद्रकांत वळवी व त्यांच्या पत्नी तसेच पियुष बोंगीरवार आणि अनिल वसावे हे उपस्थित होते. मात्र, अतिरिक्त जिल्हाधिकारी जीवन गलांडे यांना मुंबईत तातडीच्या बैठकीस जावे लागले. त्यामुळे सुनावणीचे कामकाज होऊ शकले नाही. पुढील सुनावणी 11 जुलैला होणार आहे. यावेळी वळवी यांनी याप्रकरणी चौकशी सुरू असून शासनाचे आदेश पाळू, असे सांगत अधिक बोलणे टाळले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT