प्रविण शिंगटे
सातारा : ग्रामीण भागात रोजगार हमी योजनेंतर्गत होणार्या वैयक्तीक लाभासह सार्वजनिक कामांचा लेखाजोखा व समन्वयक म्हणून ग्राम रोजगार सेवक आपली कामिगरी बजावत आहेत. याच ग्रामरोजगार सेवकांचे मानधन तब्बल पाच महिन्यांपासून रखडले आहे. जिल्ह्यातील 1 हजार 302 ग्रामरोजगार सेवकांचे मानधन न दिल्याने ग्रामरोजगार सेवकांवर उपासमारीची वेळ आली आहे. यावर प्रशासन कधी तोडगा काढणार? असा सवाल केला जात आहे.
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेची जबाबदारी गावपातळीवर सरपंच आणि ग्रामपंचायत अधिकार्यांवर देण्यात आली आहे. या कामात ग्रामपंचायत स्तरावर अभिलेख आणि नोंदवह्या ठेवण्यासाठी मदत करण्याची आणि प्रत्यक्ष काम करण्यासाठी ग्रामरोजगार सेवकांची अर्धवेळ स्वरूपात नियुक्ती करण्यात आली आहे. यापूर्वी ग्राम रोजगार सेवकांना अकुशल कामावर मनुष्य दिवसाच्या मजुरी खर्चावर आधारीत मानधन देण्यात येत होते.
ज्या गावात जास्त काम त्या गावातील ग्राम रोजगार सेवकांना चांगले मानधन होते. तर ज्या गावात कमी काम त्या गावातील ग्रामरोजगार सेवकांना तुटपूंजे मानधन मिळत होते. मात्र शासनाने ग्राम रोजगार सेवकांना महिन्याला 8 हजार रुपये निश्चित मानधनाचा निर्णय घेतला. तसा शासन निर्णयही काढण्यात आला.
सातारा जिल्ह्यातील 11 तालुक्यात 1 हजार 302 ग्रामरोजगार सेवक कार्यरत आहेत. जिल्ह्यातील ग्रामरोजगार सेवकांना मार्चअखेर मानधन मिळाले आहे. मात्र एप्रिल, मे, जून , जुलै, ऑगस्ट या पाच महिन्याचे मानधन अद्यापही मिळाले नाही. त्यामुळे गावोगावी असणार्या ग्राम रोजगार सेवकांवर उपासमारीची वेळ आली आहे.
विविध प्रकारची कामे या ग्रामरोजगार सेवक करत असतात मात्र त्यांना कामाच्या मोबदल्यात तटपुंजे मानधन मिळते. तेही पाच महिन्यांपासून थकीत आहे. त्यामुळे कर्ज काढून व उसनवारी करून घरखर्च भागवावा लागत आहे. अनेकांनी दागिने गहाण ठेवले आहे. तर कर्जाचे हफ्ते थकीत राहिल्याने बँकवाले दारी येवू लागले आहेत. सर्व घराचे बजेट कोलमडले असून थकीत मानधन लवकरात लवकर द्यावे, अशी मागणी होत आहे.
सातारा जिल्ह्यातील ग्रामरोजगार सेवकांनी मानधन वेळेवर मिळावे यासाठी प्रशासनाकडे वारंवार पाठपुरावा केला आहे. जिल्हा प्रशासनाने मानधनासंदर्भात शासनाकडे वेळोवेळी पत्रव्यवहार केला आहे. मात्र, कोणतीही कार्यवाही होत नसल्याने ग्राम रोजगार सेवक हताश झाले आहेत. केलेल्या कामाचा 5 महिन्यापासून मोबदलाच मिळत नसल्यामुळे ग्रामरोजगार सेवकांची फरफट सुरू आहे.
सातारा जिल्ह्यातील 1 हजार 497 ग्रामपंचायतीमध्ये जावली 110, कराड 167, खंडाळा 34, खटाव 105, कोरेगाव 126, महाबळेश्वर 79, माण 95, पाटण 218, फलटण 109, सातारा 160, वाई 99 असे मिळून 1 हजार 302 ग्राम रोजगार सेवक कार्यरत आहेत.