मीना शिंदे
सातारा : गणेशोत्सवामध्ये बाप्पांबरोबरच गौरी आगमन व पूजन हे खास आकर्षण ठरले होते. त्यातच सजावट स्पर्धांना बहर आल्याने गौरी पूजनाला विशेष सजावट व देखाव्यांकडे महिलांचा कल वाढला. सण-समारंभांच्या रेडीमेड थीम, साडी ड्रेपींग, साजशृंगाराच्या व्यवसायाची नवी दालने खुली झाली. सजावट साहित्य, नैवेद्य, फराळाचे पदार्थ आदि साहित्यातून बाजारपेठेत लाखोंची उलाढाल झाली. गौरी गणपतीमुळे महिला उद्योजिका व त्यांच्या उद्योगांना बळकटी मिळाली.
गणेशोत्सव हा आनंद व चैतन्याचा उत्सव असल्याने तो साजरा करताना गणेशभक्तांचा उत्साहदेखील अधिक असतो. अलीकडे उत्सवाला स्पर्धेचे स्वरुप आल्याने आपलाच बाप्पा अन् उत्सव अधिक सरस ठरावा यासाठी प्रयत्नशील राहत आहेत. त्यामुळे त्यावर आधारित विविध व्यवसायही उदयास आले. उत्सवाच्या पार्श्वभूमीवर लाखोंची उलाढाल झाली. या उलाढालीतून महिला उद्योगांना चालना मिळाली असून महिला उद्योजिकांना पाठबळ मिळाले आहे.
गौरींसाठी साडी ड्रेपींग हा नवीनच व्यवसाय गेल्या पाच वर्षात उदयास आला आहे. गौरी सजावटीत विविधता आणण्यासाठी वेगळ्या धाटणीचा पेहराव केला जातो. त्यामध्ये गुजराथी, शेतकरी, पेशवाई आदि पेहरावाचा समावेश आहे. पारंपरिक पेहरावामध्ये महाराष्ट्रीयन कासटा, शेतकरी कासटा, लावणी कासटा, ब्राम्हणी, पेशवाई, मस्तानी, बेबी कासटा, राजलक्ष्मी कासटा यांसह साडी ड्रेपींगचे 10 हून अधिक प्रकार उत्सवात पहायला मिळतात. तसेच काही फॅन्सी पेहरावही केले जात असून त्यासाठी विशेष कौशल्य लागत असल्याने ते शिवून घेतले जातात. त्यामुळे हादेखील नवीन व्यवसाय हल्ली वाढू लागला आहे.
उत्सवामध्ये पूजा व आरतीसाठी आकर्षक सजवलेल्या थाळीला चांगली मागणी राहते. तसेच कुंदण, मोत्यांनी सजवलेल्या फायबर, काच व प्लास्टिकचे करंडेही खरेदी केले जातात. तसेच धावपळीच्या युगात रेखीव रांगोळी काढण्याचे कौशल्य आत्मसात करणे किंवा त्यासाठी पुरेसा वेळ मिळत नाही. त्यामुळे अशा तयार धाग्यांच्या, लोकरीच्या व मोत्यांचे रांगोळी सेटही महिला उद्योजिकांकडून तयार केले जातात. ते सर्व महिलाच तयार करत असल्याने गरजू महिलांंच्या हाताला काम व रोजगार मिळत आहे.
गणेशोत्सवामध्ये बाप्पांचा आवडता नैवेद्य म्हणून मोदकाला मानाचे स्थान आहे. या मोदकामध्येही विविधता असून दहा ते बारा प्रकारचे मोदक बाप्पांच्या नैवेद्यात वापरले जातात. अनेक गृहिणी उत्सवामध्ये उकडीचे, चॉकलेट, मावा, खव्याचे मोदत तयार करुन देण्याच्या ऑर्डर घेतात. केवळ दहा दिवसांचा व्यवसाय चांगली कमाई करुन जातो. तसेच गौराईंच्या पूजनादिवशी जास्तीत जास्त पदार्थांचा नैवेद्य दाखवण्याची परंपरा आहे. त्यासाठी महिला बचतगट पंधरा दिवसांपासून तयारीला लागतात. बाप्पांच्या आगमनापासून त्याची विक्री सुरु होते. बचतगटाच्या महिलांच्या अर्थकारणाला चालना मिळते.
गणेशोत्सवामध्ये महिलांच्या जिव्हाळ्याचा विषय म्हणजे हळदी-कुंकू समारंभ. गौरी पूजनादिवशी घरोघरी हळदी-कुंकू कार्यक्रम ठेवण्यात येत असल्याने महिलांची गर्दी राहते. अनेक महिला त्यानिमित्त एकमेकींच्या घरी जमत असल्याने गौराईंची सजावट, फराळ अन् पेहरावाची चर्चा अधिक होते. या कार्यक्रमासाठी महिला मेकअपची ऑर्डर देत असत मात्र आता त्यामुळे आपलीच गौराई अधिक सुंदर दिसावी यासाठी गौराईंचाही आकर्षक मेकअप करण्याचा ट्रेंड सुरु झाला आहे. त्यामुळे मेकअप आर्टिस्टला मागणी वाढली असून उत्सवानिमित्त नवीन व्यवसाय मिळत आहे.