Ganja worth 2.5 lakh seized in Satara from LCB
सातारा : पुढारी वृत्तसेवा
सातारा शहर परिसरात दुचाकीवरुन गांजा घेवून जात असताना स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने (एलसीबी) एकाला पकडले आहे. अतुल धनाजी भगत (वय २७, रा. गणेश चौक, कोडोली, सातारा) असे अटक केलेल्याचे नाव आहे. संशयिताकडून २ लाख ६५ हजार ५०० रूपयांचा गांजा जप्त करण्यात आला आहे. या घटनेची नोंद सातारा शहर पोलिस ठाण्यात झाली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, दि.१४ मे रोजी एलसीबीच्या पथकाला साताऱ्यात गांजा वाहतूक होत असल्याची माहिती मिळाली. दुचाकी क्रमांक एम.एच.११ डी.सी ८२७८ यावर संशयित जाणार असल्याचे पोलिसांना समजले. त्यानुसार पोलिसांनी पथक तयार करुन सातारा शहरात सापळा लावला.
संबंधित दुचाकी पोलिसांच्या निदर्शनास आल्यानंतर पोलिसांनी त्यावरील चालकाला थांबवले. यावेळी दुचाकीवर बांधून ठेवलेले एक पोते होते. पोलिसांनी त्याबाबत विचारणा केली असता संशयिताने उडवाउडवीची उत्तरे दिली.
पोलिसांनी पोत्यामध्ये पाहिला असता त्यात गांजा होता. याची बाजारभावाप्रमाणे २ लाख ६५ हजार ५०० रुपये होत आहे. पोलिसांनी दुचाकी, गांजा जप्त करुन संशयिताला ताब्यात घेतले. सातारा शहर पोलिस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, नोव्हेंबर २०२२ पासून गांजा, गांजाची झाडे व अफूची झाडे अशा एकूण ४४ कारवाई करण्यात आल्या आहेत. यामध्ये २ कोटी ३९ लाख ३३ हजार १७० रुपये किंमतीचा १ हजार ६७.१२९ किलो ग्रॅम वजनाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पोलिस अधीक्षक समीर शेख, अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडूकर, पोनि अरुण देवकर, सपोनि रोहित फार्णे, फौजदार विश्वास शिंगाडे, परितोष दातीर, पोलीस विजय कांबळे, शरद बेबले, लक्ष्मण जगधने, लैलेश फडतरे, प्रविण फडतरे, अरुण पाटील, गणेश कापरे, अविनाश चव्हाण, विशाल पवार, सचिन ससाणे या पोलिसांनी कारवाईत सहभाग घेतला.