

पाटण : संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागलेल्या कोयना धरण जल वर्ष पूर्तीला अवघा पंधरा दिवसांचा कालावधी शिल्लक असताना धरणात सध्या 28.49 टीएमसी उपलब्ध तर 23.37 टीएमसी उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे. यावर्षी धरणात तब्बल 184.25 टीएमसी पाण्याची आवक झाली. त्यापैकी आत्तापर्यंत वापरात 106.69 तर विनावापर 59.30 टीएमसी अशा एकूण 165.99 टीएमसी पाण्यानंतरही धरणात सध्या 28.49 टीएमसी पाण्यावर उर्वरित मे महिन्यातील वीजनिर्मिती व सिंचनाचा प्रश्न सुटणार आहे.
एक जूनपासून सुरु होणार्या नव्या वर्षारंभाला धरणात सरासरी 10 टीएमसी पाणीसाठा शिल्लक राहील, अशीच सध्याची तांत्रिक व तितकीच समाधानकारक आकडेवारी पाहायला मिळत आहे. यामुळे सध्यातरी कोयना धरणातील पाण्याविषयी कोणत्याही प्रकारची चिंता करण्याची गरज नसल्याचे नैसर्गिक चित्र आहे. धरणाची नैसर्गिक व तांत्रिक परिस्थिती सध्या मजबूत असली तरी नव्या वर्षारंभात जून महिन्यात पहिल्या किंवा दुसर्या पंधरवड्यात अपेक्षित पाऊस मात्र तितकाच गरजेचा मानला जात आहे.
कोयना धरण म्हटलं की ऐन उन्हाळ्यात पाण्यासाठी व पावसाळ्यात पाण्यामुळे सार्वत्रिक चिंता व्यक्त केली जाते. सध्या वीजनिर्मिती व सिंचनाच्या गरजेपोटी कोयना धरणातील पाणीसाठ्याबाबत सार्वत्रिक चिंता व चर्चा सुरू आहे.
यावर्षी धरणात तब्बल 184.25 टीएमसी पाण्याची आवक झाली आहे. आतापर्यंत यापैकी पश्चिमेकडील पोफळी, कोयना चौथा टप्पा, अलोरे या जलविद्युत प्रकल्पांसाठी 62.16 टीएमसी पाण्याचा वापर झाला आहे. पूर्वेकडे सिंचनासाठी सोडलेल्या 26.89 व पूरकाळातील 9.10 टीएमसी अशा पूर्व व पश्चिम दोन्ही बाजूच्या एकूण चार जलविद्युत प्रकल्पातून पाणीवापर होऊन यातून आत्तापर्यंत 2999.011 दशलक्ष युनिट वीजनिर्मिती झाली आहे.
सिंचनासाठी पूर्वेकडे 26.89, पूरकाळात 9.10, धरण पायथ्याशी असलेल्या आपत्कालीन तथा विमोचक दरवाजातून 8.54 असे 44.53 टीएमसी वापरात आले होते. तर पावसाळ्यात धरणाच्या सांडव्यावरून विनावापर 59.30 टीएमसी पाणी विनावापर सोडण्यात आले होते. अशा एकूण 165.99 टीएमसी नंतरही सध्या धरणात 28.49 टीएमसी पाणीसाठा शिल्लक आहे.
या तांत्रिक जलवर्षपूर्तीला आता केवळ पंधरा दिवसांचा कालावधी शिल्लक आहे. 1 जून ते 31 मे या तांत्रिक जलवर्षात पश्चिम वीजनिर्मितीसाठी 67.50 टीएमसी पाणी आरक्षित ठेवण्यात आलेले असते. आत्तापर्यंत यापैकी 62.16 टीएमसी पाणीवापर झाल्याने आता उर्वरित पंधरवड्यात उर्वरित आरक्षीत 5.34 टीएमसीवर पश्चिमेकडील वीजनिर्मिती करावी लागणार आहे. कदाचित या काळात पश्चिम वीजनिर्मितीसाठी अतिरिक्त पाण्याची गरज लागली तर ऐनवेळी तात्पुरती तरतुदीनुसार ज्यादा चार टीएमसी पाणी पश्चिम वीजनिर्मितीसाठी वापरात आणले जाऊ शकते. उर्वरित काळात पूर्वेकडे सिंचनासाठी सरासरी सात टीएमसी पाण्याची गरज भासू शकते.