कराड : येथील शंभूतीर्थ चौक येथे कार्यरत असलेल्या मेट्रोपोलिस या लॅबोरेटरीमध्ये डॉक्टरांच्या अनुपस्थितीत पॅथोलॉजी चाचण्या करून बनावट स्वाक्षरीने रुग्णांना अहवाल देण्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी कराडमधील पॅथोलॉजिस्ट डॉ. संदीप मोहनराव यादव (वय 52, रा. शनिवार पेठ, कराड) यांनी कराड शहर पोलिसांकडे या लॅबशी संबंधित 17 जणांविरोधात तक्रार दिली आहे.
डॉ. संदीप यादव यांनी डॉ. सुशील शहा (पुणे), अमिरा सुशील शहा, विवेक गंभीर, संजय भटनागर, मिलिंद सरवदे, अनिता रामचंद्रन, हेमंत सचदेव, कमलेश कुलकर्णी (सर्व मुंबई), विनायक दंताल (कोल्हापूर), डॉ. स्मिता सडके (पुणे) यांच्यासह कराड येथील भागीदार व कर्मचारी विद्याधर भागवत, प्रविण कांबळे, सुषमा चव्हाण, अनिलकुमार जाधव, योगिनी व्यास, सतिश जाधव, सचिन मोरे यांच्याविरोधात कराड शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
डॉ. संदीप यादव यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, संबंधित लॅबोरेटरीमध्ये रुग्णांच्या रक्त-लघवी आदी नमुन्यांवर चाचण्या करून त्यांचे अहवाल तयार केले जातात. या अहवालांवर पॅथोलॉजी विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलेल्या व महाराष्ट्र वैद्यकीय परिषद नोंदणीकृत वैद्यकीय व्यावसायिक डॉ. स्मिता सडके यांच्या स्कॅन केलेली सही व शैक्षणिक पात्रतेचा उल्लेख केला जातो. मात्र त्या प्रत्यक्ष प्रयोगशाळेमध्ये हजर नसतानाच टेक्निशियन व इतर कर्मचारी स्वतःच अहवाल तयार करत असल्याचे निदर्शनास आले आहे. जुलै 2023 मध्ये चाचणीसाठी गेलेल्या अभिजीत महाडीक यांच्या अहवालांवरही अशीच स्कॅन सही वापरल्याचा उल्लेख डॉ. संदीप यादव यांनी तक्रारीत केला आहे.
डॉक्टरांच्या अनुपस्थितीत अहवालांवर स्वाक्षरी करणे हे महाराष्ट्र वैद्यक व्यवसाय अधिनियम 1961 च्या कलम 33 तसेच सर्वोच्च न्यायालय (12 डिसेंबर 2017) व मध्यप्रदेश उच्च न्यायालय (13 जानेवारी 2003) यांच्या निर्णयांचे उल्लंघन असल्याचे तक्रारीत नमूद केले आहे. या अवैध प्रकारातून आर्थिक फायदा करून जनतेची फसवणूक करण्यात आल्याचा आरोप डॉ. यादव यांनी तक्रारीद्वारे केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी चौकशी सुरू केली आहे.
कायदेशीर बाबींचे काटेकोरपणे पालन...
या तक्रारीच्या पार्श्वभूमीवर मेट्रोपोलिस ही निदान सेवा प्रदान करण्यात गुंतलेली आहे. केवळ कायदेशीररित्या परवानगी असलेल्या व्यावसायिक क्रियाकलाप करते. तसेच सर्व लागू वैधानिक परवाने, मान्यता आणि नोंदणी योग्यरित्या मिळवल्या जातात आणि सतत राखल्या जातात याची खात्री करते. नेहमीच सर्व संबंधित कायदेशीर, नियामक आणि प्रक्रियात्मक आवश्यकतांचे काटेकोरपणे पालन करते, असे मेट्रोपोलिसकडून सांगण्यात आले आहे.