

सातारा : साताऱ्यात अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारित सेंटर फॉर इन्व्हेन्शन, इनोव्हेशन, इन्क्युबेशन ॲन्ड ट्रेनिंग सेंटर उखखखढ (‘सीट्रिपलआयटी’) स्थापन करण्याचा प्रस्ताव टाटा टेक्नॉलॉजीजने राज्य सरकारकडे सादर केला आहे. हा प्रकल्प 115 कोटी रुपयांचा असून यासंदर्भात कंपनीने मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांना पत्र पाठवून प्रकल्पाची माहिती दिली आहे.
साताऱ्याचे उद्योग जगत विस्तारू लागले असून नुकत्याच मंजूर झालेल्या आयटी पार्कमुळे येथील औद्योगिकीकरण कात टाकू लागले आहे. लिंब खिंड नागेवाडी परिसरात हे नवे आयटी पार्क साकारत असून त्यासाठी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांचा सातत्याने पाठपुरावा सुरू आहे. असे असतानाच आता टाटा टेक्नॉलॉजीजच्या सीआयआयआयटी प्रस्तावामुळे येथील आयटी पार्कला आणखी बळकटी येणार आहे.
‘टाटा टेक्नॉलॉजी’ कंपनीने केंद्र मंजुरीचे पत्र राज्य शासनाला पाठवले असून टाटा आणि राज्य शासनाच्या सहकार्यातून सातारा येथे हे नवीन केंद्र लवकरच उभे राहणार आहे. यामुळे सातारा जिल्ह्यातील युवकांना उद्योगांच्या गरजेनुसार अत्याधुनिक ‘एआय’ तंत्रज्ञानासह रोजगाराभिमुख कौशल्य विकासाचे प्रशिक्षण मिळणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केंद्र मंजुरीसाठी केलेल्या सहकार्याबद्दल ना. शिवेंद्रराजे यांनी दोघांचेही आभार मानले आहेत.
उद्योगक्षेत्रात तंत्रज्ञानाच्या जलद बदलामुळे कौशल्याधारित प्रशिक्षणाची गरज वाढली असून सध्याची व्यावसायिक प्रशिक्षण प्रणाली स्पर्धात्मक उद्योगमानकांशी जुळत नसल्याचे टाटा टेक्नॉलॉजीजने नमूद केले आहे. तंत्रज्ञानातील प्रगती, नवीन मॉडेल्स आणि उद्योग 4.0 कौशल्यांमुळे रोजगार संधी बदलत आहेत, परंतु विद्यमान शैक्षणिक पद्धती मागे पडत असल्याने कुशल मनुष्यबळाचा तुटवडा जाणवत आहे. या पार्श्वभूमीवर होत असलेल्या सीआयआयआयटी सेंटरमुळे नवा बदलाव येणार आहे.
टाटा टेक्नॉलॉजीजने कर्नाटक, तामिळनाडू, बिहार आणि आसाम या राज्यांत असे कौशल्यविकास केंद्र यशस्वीरीत्या उभारले आहेत. चंद्रपूर आणि गडचिरोली येथेही राज्य सरकारच्या सहकार्याने असेच प्रकल्प राबवले आहेत. आता साताऱ्यात उद्योग 4.0 कौशल्यांसाठीच्या प्रशिक्षणाची उणीव भरून काढण्यासाठी सीआयआयआयटी उभारण्याचा प्रस्ताव करण्यात आला आहे.
या केंद्रामध्ये अत्याधुनिक उपकरणे, प्रयोगशाळा, सुविधा उन्नतीकरण, अभ्यासक्रम पुनर्रचना व नवीन तंत्रज्ञान प्रशिक्षणाचा समावेश होणार आहे. हे केंद्र सुरू झाल्यावर दरवर्षी सुमारे 3000 विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिले जाईल, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. प्रस्तावित प्रकल्पाची एकूण रक्कम 115 कोटी असून, त्यातील 15 टक्के हिस्सा साताऱ्यातून उभारला जाईल. उर्वरित खर्च टाटा टेक्नॉलॉजीज व उद्योग भागीदार उचलणार असल्याचे या संदर्भातील पत्रात नमूद आहे.
सातारा येथे होणाऱ्या या ‘सीट्रिपलआयटी’ केंद्राच्या एकूण 115 कोटींच्या खर्चापैकी 97 कोटी 75 लाख रुपये टाटा कंपनीतर्फे तर, 17 कोटी 25 लाख रुपये राज्य शासनाकडून उपलब्ध करण्यात येणार आहेत. प्रकल्पाचा वाटा म्हणून सातारा जिल्ह्याचा वाटा म्हणून शासनाला निधी उपलब्ध करावा लागणार आहे. केंद्र स्थापन व स्थापना कामांसोबत पुढील तीन वर्षे प्रशिक्षणामध्ये उद्योग भागीदार वित्तीय सहाय्य करतील. राज्य सरकारवर कोणताही अतिरिक्त आर्थिक बोजा येणार नाही, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.