Satara Sub District Hospital Phaltan Doctor Death Case
सातारा : सातारा जिल्ह्यातील फलटण येथून एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. फलटण उपजिल्हा रुग्णालयात कार्यरत असलेल्या एका महिला डॉक्टरने शहरातील एका हॉटेलमध्ये गळफास घेऊन जीवन संपवले. जीवन संपवण्यापूर्वी डॉक्टरने हातावर सुसाईड नोट लिहिली होती. या नोटमध्ये दोन पोलीस अधिकाऱ्यांचे नाव असून या घटनेनं साताऱ्यासह राज्यभरात खळबळ उडली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मयत महिला या फलटण उपजिल्हा रुग्णालयात डॉक्टर म्हणून सेवा देत होत्या. त्यांनी गुरुवारी रात्री शहरातील एका हॉटेलमध्ये टोकाचे पाऊल उचलत गळफास घेऊन आपले जीवन संपवले. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. जीवन संपवण्यापूर्वी संपदाने हातावर मृत्यूसाठी जबाबदार असलेल्या पोलिसांची नावं देखील लिहून ठेवली होती.
पोलीस उपनिरीक्षक गोपाल बदने याने माझ्यावर चार वेळा अत्याचार केला, तर पोलीस प्रशांत बनकर याने मला मानसिक त्रास दिला, असे पीडितेने हातावर लिहून ठेवले आहे. याप्रकरणाने उपजिल्हा रुग्णालयात खळबळ उडाली असून पोलिसांनी या घटनेचा तपास सुरू केला आहे.
मी साताऱ्याच्या पोलीस अधीक्षकांशी चर्चा केली असून त्यांनी वरिष्ठ महिला अधिकाऱ्याला घटनास्थळी पाठवले आहे. घटनेला गांभीर्याने घेण्याचे निर्देश पोलिसांना दिले असून सध्या पुरावे गोळा करण्यावर भर दिला जात आहे. नराधमांना लवकरच अटक केली जाईलशंभूराजे देसाई, पालकमंत्री
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील या घटनेची दखल घेतली असून महिला डॉक्टरने ज्या पोलिसांच्या नावाचा उल्लेख केलाय त्यांना तत्काळ निलंबित करण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत. आरोपींवर कठोर कारवाई करण्याचे आदेशही त्यांनी दिले आहेत.
या घटनेनंतर राज्यात संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी ही अत्यंत दुर्दैवी घटना असल्याचे म्हटले आहे. 'एफआयआरची प्रक्रिया आणि आरोपींना पकडण्याची प्रक्रिया सुरू आहे. एक आरोपी साताऱ्याच्या बाहेर आहे, त्याला पकडण्यासाठी पोलिसांचे पथक रवाना झाले आहे. नक्की काय घडले याचा तपास सुरू आहे. पीडित मुलीने आधी तक्रार दिली होती का? दिली असेल, तर तक्रार का घेतली नाही, याची माहिती घेतली जात आहे,' असे त्या म्हणाल्या.
पीडितेच्या काकांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. 'आम्हाला काहीही न सांगता तिने ड्युटी संपल्यानंतर हॉटेलवर जाऊन आत्महत्या केली. अनेकदा पोस्टमॉर्टम करतेवेळी रिपोर्ट बदलून द्या म्हणून अधिकाऱ्यांचा त्रास होता, असे ती याआधी सांगायची. असा सतत त्रास झाला तर आत्महत्या करेन, असेही ती सांगायची. याबाबत डीवायएसपींकडे तक्रार केली होती, पण त्यावर उत्तर आलेलं नाही,' असे त्यांनी म्हटले आहे."