फलटण येथील सभेत ना. गुलाबराव पाटील, ना. शंभूराज देसाई, ना. योगेश कदम, आ. नीलेश राणे, आ. रामराजे ना. निंबाळकर, अनिकेतराजे ना. निंबाळकर आदींनी हात उंचावून जनतेला अभिवादन केले. Pudhari Photo
सातारा

Shiv Sena Faltan | फलटणमध्ये दादागिरीला थारा देणार नाही

ना. गुलाबराव पाटील?: शिवसेनेचा भगवा फडकवा

पुढारी वृत्तसेवा

फलटण : फलटण शहरात शिवसेनेच्या माध्यमातून विकासाचा नवा अध्याय सुरू होत आहे. दादागिरी करणार्‍या चुकीच्या प्रवृत्तीला हद्दपार करण्यासाठी व फलटणच्या चौफेर विकासासाठी फलटण नगरपालिकेवर शिवसेनेचा भगवा फडकवा. 22 वर्षाच्या युवकाला दमदाटी केली जाते म्हणजेच त्यांच्या पायाखालची वाळू घसरू लागली आहे. दादागिरी करणार्‍यांची पार्श्वभूमी चेक करा. मतदान करताना कोणतीही चूक करू नका. अनिकेतराजे व त्यांच्या टीमच्या पाठीशी भक्कमपणे उभे रहा, असे आवाहन राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी केले.

शिवसेना व महायुतीच्या नगराध्यक्ष व नगरसेवकपदाच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित सांगता सभेत ते बोलत होते. यावेळी पालकमंत्री शंभूराज देसाई, गृह राज्यमंत्री योगेश कदम, आ. नीलेश राणे, आ.रामराजे नाईक निंबाळकर, माजी आमदार दीपक चव्हाण, रघुनाथराजे ना. निंबाळकर, सुभद्राराजे नाईक निंबाळकर, शिवांजलीराजे नाईक निंबाळकर, विश्वजीतराजे नाईक निंबाळकर, शिवसेना संपर्कप्रमुख शरद कणसे, जिल्हाप्रमुख चंद्रकांत जाधव, महिला आघाडी प्रमुख शारदाताई जाधव, विराज खराडे, अविनाश फडतरे, नानासाहेब हिवरे, निलेश तेलखडे, नगराध्यक्षपदाचे उमेदवार अनिकेतराजे नाईक निंबाळकर, नगरसेवक पदाचे सर्व उमेदवार, शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

ना. गुलाबराव पाटील म्हणाले, फलटणमध्ये दादागिरी, दहशत व चुकीच्या प्रवृत्तीला आता कायमचा आळा घातला जाईल. सत्तेच्या बळावर सामान्य नागरिकांना वेठीस धरण्याचा प्रकार शिवसेना खपवून घेणार नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली राज्यात विकासाभिमुख आणि लोककल्याणकारी निर्णय घेण्यात आले आहेत. महिलांसाठी एसटी प्रवासात अर्धे तिकीट योजना, ‘लाडकी बहीण’ योजनेंतर्गत महिलांना दरमहा पंधराशे रुपयांची मदत, तसेच मुलींसाठी मोफत शिक्षण योजना सुरू करण्यात आली असून या योजना भविष्यातही अखंडपणे सुरू राहतील, असे त्यांनी स्पष्ट केले.

फलटणच्या विकासात आ. रामराजे नाईक निंबाळकर यांचे मोलाचे योगदान असून कृष्णा खोरे महामंडळाच्या माध्यमातून पाणी अडवण्याचे काम प्रभावीपणे राबवण्यात आले. त्यामुळे औद्योगिक वसाहती, कारखाने व व्यवसाय वाढीस लागले असून शहराचा विकास गतिमान झाला आहे. पिण्याच्या पाण्याच्या योजनाही प्रभावीपणे राबवण्यात आल्या असल्याचे ना. गुलाबराव पाटील यांनी सांगितले.

फलटण शहराच्या सुरक्षितता, विकास आणि सुव्यवस्थेसाठी शिवसेना सदैव खंबीर राहील.फलटण शहराला निधीची कोणतीही कमतरता भासणार नाही. नगरविकास खाते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे असून जिल्ह्याचा निधी पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्याकडे आहे. त्यामुळे विकासकामांसाठी आवश्यक तो निधी सहज उपलब्ध होईल, असा विश्वास ना. गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केला.

गृहराज्यमंत्री योगेश कदम म्हणाले, मी प्रथमच माझ्या जन्मभूमीत येत आहे याचा मला मनस्वी आनंद होत आहे. इथे मी आल्यानंतर एका बावीस वर्षाच्या युवकाने धमकीचं रेकॉर्ड मला ऐकवलं. गृहराज्यमंत्री म्हणून मी तुम्हाला विश्वास द्यायला आलोय की आता इथे कोणाची दादागिरी चालणार नाही. ज्या ठिकाणी गृहराज्यमंत्री व शिवसेना एकत्र येते तेथे कोणाची दादागिरी चालत नाही. येथील निवडणूक कायद्यानेच होईल, हा विश्वास तुम्हाला देण्यासाठी आलोय. आमचा कोणताही कार्यकर्ता कायदा मोडणार नाही. समोरून कोणी कायदा मोडत असेल तर त्यांना पाठीशी घालणार असाल तर ते चालणार नाही.

तसं झालं तर शिवसैनिक म्हणून मी उत्तर देईन. गृह राज्यमंत्रीपद विसरून जाऊन उत्तर देईल. फलटणकरांसाठी तुमच्या घराघरासाठी ही निवडणूक अत्यंत महत्त्वाची आहे. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी चाळीसाव्या वर्षापासून फलटणच्या जिल्ह्याच्या विकासासाठी ते झिजलेत येथील विकास केला अशा विकास करणार्‍या वर जर कोणी बोलत असेल तर त्यांना मतदानातून उत्तर द्या. नगराध्यक्षासह सर्व नगरसेवकांच्या पाठीशी रहा. एकनाथ शिंदे यांच्या नगर विकास खात्याच्या माध्यमातून शहराला निश्चितपणे मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध होईल. शहराचा विकास होईल.

विरोधकांच्या पायाखालची वाळू घसरू लागल्याने ते धमकी देत सुटलेत. तुम्ही शांत रहा. शिवसेनेच्या कार्यकर्त्याला संरक्षण देण्याचा मी तुम्हाला शब्द देत आहे. मुख्यमंत्र्यांनी सुरू केलेली लाडकी बहीण योजना चंद्र - सूर्य असेपर्यंत कधीही बंद होणार नाही. ही योजना होऊ नये यासाठी विरोधकांनी प्रयत्न केले. शिवसेनेचा स्वाभिमान जपण्यासाठी आम्ही एकनाथ शिंदे यांच्यासोबत जाऊन उठाव केला होता आम्ही आमचे आमदारकी पणाला लावली होती, असेही ते म्हणाले.

भगवा लहरा देंगे...

फलटण नगरी छत्रपती शिवाजी महाराजांची सासुरवाडी, छत्रपती संभाजी महाराजांचे आजोळ आहे. प्रभूरामाची नगरी आहे. या नगरीत तुम्ही डाकूंना निवडून देणार का? फलटणनगरीत ज्यांचे नाव महिला आत्महत्या प्रकरणात येते अशांना निवडून देणार का? ‘तंबू भी लगा देंगे तो लगा देंगे धूमधाम से और बंबू भी लगा देंगे तो धूमधाम से, भगवा लहरा देंगे धूमधाम से.’ विरोधक साडी वाटप करतात. भावांना धोतर कधी वाटणार? असा सवाल ना. गुलाबराव पाटील यांनी केला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT