सैदापूर गावच्या हद्दीत पोलिसांची कारवाई
वरिष्ठ पोलिस निरीक्षकांना गोपनिय बातमीदाराकडून मिळाली माहिती
दोन कारसह बनावट दारू बनविण्याचे साहित्य पोलिसांनी केले जप्त
कराड : कराड शहर पोलीस ठाण्याच्या पथकाने रसायनयुक्त बनावट देशी दारू बनवणार्या टोळीचा पर्दाफाश केला आहे. सैदापूर गावच्या हद्दीत कराड विटा रस्त्यालगत छापा टाकून पोलिसांनी तिघांना अटक केली. या कारवाईत बनावट देशी दारूसह ते तयार करण्यासाठी वापरण्यात येणारे साहित्य, दोन कार असे एकूण 11 लाख 38 हजार 550 रुपयांचे साहित्य पोलिसांनी जप्त केले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, कराड विटा रस्त्यालगत सैदापूर गावच्या हद्दीत जिव्हाळा ढाब्याच्या समोरील बाजूस अपार्टमेंटमध्ये अवैधपणे मानवी जीवितास अपायकारक असणारी रसायन मिश्रित बनावट देशी दारू बनवत असल्याची माहिती शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आर. ए. ताशिलदार यांना गोपनीय बातमीदाराकडून मिळाली. त्यांनी त्वरित सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेश माळी व पथकास संबंधित ठिकाणी जाऊन कारवाई करण्याच्या सूचना दिल्या. पोलीस पथकाने मिळालेल्या माहितीच्या आधारे घटनास्थळी छापा टाकला. त्यावेळी पोलिसांना संशयास्पदरित्या मयूर कदम, विजय निगडे, मंदार कदम तेथे आढळून आले.
त्यांच्याजवळ दोन कार पोलिसांना मिळून आल्या असून त्यामध्ये 180 मिली दारूच्या काचेच्या रिकाम्या बाटल्या व लेबल असलेल्या 15 बाटल्या पोलिसांना मिळाल्या. तसेच दुसर्या कारमध्ये तपासणी केले असता तेथे रसायन भरून ठेवलेले प्लास्टिकचे सहा कॅन मिळून आले. त्यानंतर पोलिसांनी संशयितांकडे अधिक चौकशी केली असता त्यांनी एका फ्लॅटमध्ये रसायन मिश्रित बनावट टँगो पंच देशी दारू बनवत असल्याची कबुली दिली.
पोलीस अधीक्षक तुषार दोषी, अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडूकर, उपविभागीय पोलीस अधिकारी राजश्री पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक आर. ए. ताशिलदार यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि राजेश माळी, सपोनि अशोक भापकर, पोलीस उपनिरीक्षक निखिल मगदूम, कृष्णा डिसले, सतीश आंदेलवार, पोलीस हवालदार अशोक वाडकर, संदीप कुंभार, सज्जन जगताप, पोलीस नाईक संतोष पाडळे, मुकेश मोरे, महेश शिंदे, दिग्विजय सांडगे, अमोल देशमुख, संग्राम पाटील, आनंदा जाधव, मोसिन मोमीन, धीरज कोरडे, आकाश पाटील, सारंग कुंभार, ओंकार साळुंखे यांनी ही कारवाई केली.
पोलिसांनी फ्लॅटची तपासणी केली असता तेथे बॉटलिंग मशीन व इतर साहित्य मिळून आले. पोलिसांनी दोन कारसह बनावट देशी दारू बनवण्यासाठी वापरण्यात येणारे साहित्य जप्त केले आहे. तसेच संशयित तिघांना अटक करण्यात आली आहे.