

कराड : गोरगरीबांसाठी आशेचा किरण ठरणारे सौ. वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालय हे गरीब रुग्णांना दिलासा देणारे ठरले आहे. मात्र काही दिवसांपासून या रुग्णालयातील स्वच्छतेकडे दुर्लक्ष झाल्याने रुग्णालयात येणार्या रुग्णांबरोबरच त्यांच्या नातेवाईकांची प्रचंड गैरसोय होत होती. आ. डॉ. अतुलबाबा भोसले यांनी कृष्णा हॉस्पिटलमधील दहा कर्मचार्यांना पाठवत संपूर्ण स्वच्छता करून घेतली आहे. त्यामुळे रुग्णांसोबत नातेवाईकांना दिलासा मिळाला आहे.
सौ. वेणुताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयातील अस्वच्छतेची ही गंभीर समस्या एका जागरूक नागरिकाने कराड दक्षिणचे आ.डॉ. अतुलबाबा भोसले यांच्या निदर्शनास आणून दिली. रुग्ण व नातेवाईकांच्या यातना ऐकताच आ. भोसले यांनी तत्परता दाखवत कृष्णा हॉस्पिटलच्या सॅनिटरी विभागातील 10 कर्मचारी तातडीने कॉटेज हॉस्पिटलमध्ये स्वच्छतेसाठी पाठविले. या कर्मचार्यांनी स्वच्छतेसाठी लागणारे साहित्य वापरून सर्व स्वच्छतागृहे, वॉशरूम व परिसराची काटेकोर साफसफाई केली. काही तासांतच रुग्णालय चकचकीत दिसू लागले आणि दुर्गंधी नाहीशी झाली. त्यामुळे रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांनी हायसे वाटल्याचे समाधानाने व्यक्त केले.
आजच्या महागाईच्या काळात गोरगरीबांना महागड्या औषधोपचारांचा ताण सहन करणे अशक्यप्राय झाले आहे. शेतकरी व शेतमजुरांना उत्पादन खर्चाइतकेही उत्पन्न मिळत नसताना हे रुग्णालयच त्यांच्या उपचारासाठी मोठे आधारस्थान आहे. पण येथेच स्वच्छतेचा अभाव असेल तर रुग्णालयात आलेल्यांचे आरोग्य धोक्यात येते. रुग्णालय म्हणजे केवळ औषधे किंवा डॉक्टर नाहीत, तर स्वच्छ वातावरण हाच उपचाराचा पहिला टप्पा असतो. अस्वच्छतेतून आजार पसरतात, तर स्वच्छतेतून आरोग्याचा पाया मजबूत होतो.
आ. डॉ. भोसले यांच्या पुढाकारामुळे रुग्णालयात पुन्हा स्वच्छता दिसू लागली आहे. रुग्ण व नातेवाईकांच्या डोळ्यांत समाधान दिसत आहे. स्थानिक व्यवस्थापनाने दुर्लक्ष केलेल्या ठिकाणी जनप्रतिनिधींनी पुढाकार घेऊन दाखविलेली ही तत्परता रुग्णालयाच्या प्रतिमेला नवसंजीवनी देणारी ठरली आहे.स्वच्छता म्हणजेच आरोग्य आणि आरोग्य म्हणजेच जीवनाचा खरा आनंद - हे या मोहिमेतून अधोरेखित झाले. स्वच्छतेच्या या श्वासाने रुग्णालयात आशेचा नवा किरण उजाडला आहे. आ.डॉ. भोसले यांच्या कार्यतत्पपरतेचे कौतुक होत आहे. दरम्यान उपजिल्हा रूग्णालय स्वच्छ झाल्याने तेथे उपचारासाठी येणारे रूग्ण आणि नातेवाईकांनी समाधान व्यक्त केले आहे.