बामणोली : जावली तालुक्यातील बामणोलीजवळील सावरी गावच्या हद्दीतील ‘जळका वाडा’ म्हणून परिचित असणार्या एका शेडमधील एमडी ड्रग्जची फॅक्टरी उद्ध्वस्त करून मुंबई क्राईम ब्रँचने तब्बल 115 कोटींचे घबाड जप्त केले होते. या ठिकाणी ड्रग्ज तयार करण्यासाठी लाईटवरील उपकरणे वापरली जात होती. मात्र, त्यासाठीही चोरून वीज घेण्यात आली होती. ड्रग्जच्या काळ्या धंद्यात बेकायदा विजेचाही वापर संशयितांनी केला होता. या प्रकाराने आता पुन्हा खळबळ उडाली आहे.
सावरी गावच्या हद्दीतील ‘जळका वाडा’ म्हणून परिचित असणार्या एका शेडमध्ये मुंबई क्राईम ब्रँचने शनिवारी पहाटे एमडी ड्रग्जच्या फॅक्टरीवर छापा टाकून पान 2 वर 115 कोटींचे घबाड जप्त केले होते. त्यामध्ये 50 कोटींचे 7॥ किलोचे एमडी ड्रग्ज, 38 किलो लिक्विड, अमली पदार्थ निर्मितीसाठी लागणारा कच्चा माल व साहित्याचाही समावेश होता. याप्रकरणी मुंबई पोलिसांनी प्रारंभी तिघांना व रविवारी पुन्हा आणखी चौघांना अटक केली.
हे प्रकरण सोमवारी आणखी क्लिष्ट होत गेले. सावरीजवळील निर्जन ठिकाण असणार्या जळक्या वाड्यात एमडी ड्रग्ज तयार केले जात होते त्या ठिकाणी पोलिसांना ड्रग्ज तयार करण्यासाठी आवश्यक असलेली काचेची भांडी, इलेक्ट्रिक मशिन, प्लास्टिक टब, ट्रे असे साहित्य आढळून आले. ड्रग्ज तयार करण्यासाठी विजेची उपकरणे वापरण्यात येत होती. मात्र, त्यासाठी वीज कोठून घेतली गेली? हा मुद्दा पोलिसांच्या रडारवर आला.
त्याद़ृष्टीने तपास केला जात असताना संशयितांनी चोरून वीज वापरल्याचे उघडकीस आले. या वाड्याच्या जवळ असणार्या एका विजेच्या खांबावरून आकडा टाकून वीज घेण्यात आली होती. ही बाब पोलिसांनी केलेल्या पंचनाम्यात नोंदवण्यात आली आहे. याबाबतची माहिती प्रत्यक्षदर्शी साक्षीदाराने ‘पुढारी’शी बोलताना दिली.
संबंधित वाड्यात कोणीही वास्तव्याला नव्हते. त्याठिकाणी कुणाचाही वावर नव्हता. त्याचबरोबर वर्षभरापूर्वी लागलेल्या आगीमध्ये हा वाडा पूर्णपणे जळाला होता. त्यावेळी विजेचा मीटरही जळाला होता. त्यामुळे येथील कनेक्शन बंद करण्यात आले होते. मात्र, ड्रग्ज बनवण्यासाठी संशयितांनी वाड्यापासून काही अंतरावर असलेल्या विजेच्या खांबावरील विद्युत वाहिनीवर आकडा टाकून वीज घेतली होती.
संबंधीत वीज वाहिनीवरून आकडा टाकून वीज घेताना धोका पत्करल्याचे दिसून येत आहे. संबंधीत ठिकाणी विजेच्या तारा लोंबकळत आहेत. त्यामुळे या ठिकाणी दुर्घटनेची शक्यता होती. सुदैवाने हे ठिकाण निर्जनस्थळ असल्यामुळे विपरित घटना घडली नाही. मात्र, या प्रकाराने खळबळ उडाली असून अनेक प्रश्न नव्याने उपस्थित झाले आहेत.