

खटाव : श्री सेवागिरी महाराजांच्या जयघोषात महाराजांच्या पालखी व झेंड्याच्या भव्य सवाद्य मिरवणुकीने भक्तिमय व उत्साही वातावरणात श्री सेवागिरी यात्रेचा दिमाखात शुभारंभ झाला. झेंड्याच्या प्रतिष्ठापनेपासून सलग अकरा दिवस चालणाऱ्या या यात्रेत शेती, लोककला, क्रीडा, युवाचैतन्य, तसेच ग्रामीण संस्कृतीचे समग्र दर्शन घडणार आहे.
श्री क्षेत्र पुसेगाव येथे साजऱ्या होणाऱ्या यंदाच्या यात्रेचे स्वरूप आणखी व्यापक व शानदार करण्यात आले आहे. गावातील यात्रा स्थळाच्या परिसरात व सातारा-पंढरपूर रस्त्याच्या दुतर्फा पुढील बुधवारपर्यंत (दि. 24) ही यात्रा भरवण्यात येणार आहे. यात्रेस राज्यातून व परराज्यातून लाखो भाविक येत असतात. रथोत्सव यात्रेचा मुख्य दिवस येत्या गुरुवारी (दि. 18) असून, त्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह मंत्रिमंडळातील तसेच जिल्ह्यातील अनेक मान्यवर निमंत्रित आहेत.
रविवारी सकाळी 9 वाजता मंदिरात मठाधिपती श्रीमहंत सुंदरगिरी महाराज, ट्रस्टचे चेअरमन संतोष वाघ, विश्वस्त डॉ. सुरेश जाधव, रणधीर जाधव, बाळासाहेब जाधव, सचिन देशमुख, गौरव जाधव, सहायक पोलिस निरीक्षक संदीप पोमण, श्री ज्ञानाई गुरुकुलचे हभप सुरेश महाराज सुळ व मान्यवरांच्या हस्ते मानाचा झेंडा व श्री सेवागिरी महाराजांच्या पालखीचे विधिवत पूजन करण्यात आले. यावेळी ग्रामस्थ व भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पूजनानंतर झेंडा व पालखीच्या मिरवणुकीला मंदिरापासून सुरुवात झाली. भाविक व ग्रामस्थांनी जागोजागी मानाचा झेंडा व पालखीचे दर्शन घेत श्री सेवागिरी महाराजांचा एकच जयघोष केला. मुख्य बाजारपेठेतून निघालेल्या परमपूज्य सद्गुरू श्री सेवागिरी महाराजांच्या मानाचा झेंडा व पालखीच्या मिरवणुकीसमोर बँड पथक, पुसेगावातील शाळा, महाविद्यालयांचे विद्यार्थी परंपरागत पोशाखात सहभागी झाले होते. झांज पथक व लेझीम पथकातील विद्यार्थ्यांनी ठिकठिकाणी कलाविष्कार सादर केले. काही विद्यार्थ्यांनी जिवंत देखावे सादर केले. मिरवणुकीनंतर मानाच्या झेंड्याची यात्रा स्थळावर प्रतिष्ठापना करण्यात आली. याप्रसंगी बारामती ॲग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टचे प्रमुख राजेंद्र पवार, सुशांत निंबाळकर व मान्यवर उपस्थित होते. दरम्यान, सहायक पोलिस निरीक्षक संदीप पोमण यांनी चोख पोलिस बंदोबस्त ठेवून वाहतुकीचे योग्य नियंत्रण केले.