Dnyaneshwar Maharaj Palkhi Ringan Pudhari
सातारा

Dnyaneshwar Maharaj Palkhi Ringan: धावे अश्व माउलींचा, उधळे भक्तीचा गंध; चांदोबाचा लिंबमध्ये उभे रिंगण

टाळ-मृदंगा संगे, गेले रिंगण रंगुनी

पुढारी वृत्तसेवा

नवनाथ गोवेकर

तरडगाव: धावे अश्व माउलींचा, उधळे भक्तीचा गंध ।रिंगणात हरपले भान, दुमदुमला विठ्ठलनामाचा छंद ॥ या भावस्पर्शी ओळींचा प्रत्यय देणारा संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्यातील पहिले उभे रिंगण चांदोबाचा लिंब (ता. फलटण) येथे भक्ती, उत्साह आणि माऊलींच्या अविरत गजरात पार पडले.

माऊलींच्या अश्वाच्या दौडीने आणि वारकऱ्यांच्या टाळ-मृदंगाच्या निनादाने अवघा परिसर भक्तिरसात चिंब भिजून गेला. ‘याची देही याची डोळा’ हा अद्वितीय सोहळा अनुभवताना लाखो भाविकांच्या डोळ्यांचे पारणे फिटले, तर रिंगणाच्या प्रत्येक क्षणाने भक्ती आणि श्रद्धेचा अनोखा आविष्कार घडवला.

माऊलींच्या पालखी सोहळ्यातील पहिल्या उभे रिंगण सोहळ्यात टाळ-मृदंगांचा गजर अन् विठ्ठलनामाचा जयघोष झाला. रिंगण सोहळा यावर्षीही वारकऱ्यांसाठी वारीचा आनंद द्विगुणीत करणारा ठरला. भक्तिमय वातावरण, फडफडणाऱ्या भगव्या पताका, टाळ मृदंगाचा गजर, कोणी लेकरांना डोक्यावर घेऊन तर कोणी मिळेल त्या जागी टाचा उंच करून, कोणी जवळ उभ्या असणाऱ्या वाहनाच्या टपावर तर कोणी झाडावर चढून उभे रिंगण पाहण्यासाठी आतुरले होते.

भक्तिमय वातावरणात तान्ह्या बाळापासून ते नव्वदी पार असलेले माऊली रिंगण सोहळ्याचा आनंद आपल्या डोळ्यात टिपण्यात अतुर झाले होते. रंगरंगोटी केलेले, फुलांची सजावट केलेले चांदोबाचा लिंब मंदिर सर्वांना आकर्षित करत होते.

अखेर माऊलींची पालखी तरडगावपासून अवघ्या काही अंतरावर असलेल्या चांदोबाचा लिंब याठिकाणी पोहचली. चोपदारांनी उभे रिंगण सोहळ्याच्या जागेची पाहणी केली. सोहळ्यातील सर्व दिंड्यातील वारकरी रस्त्याच्या मध्ये एकमेकांसमोर दोन रांगांमध्ये उभे राहत ‘माऊली माऊली... ग्यानबा तुकाराम’चा जयघोष सुरू करत रिंगण पूर्वीच रिंगणाची महती दाखवून दिली.

माऊलींच्या पालखी सोबत दोन अश्व होते. एकावर स्वतः माऊली तर दुसरा अश्व शितोळे सरकारांचा ज्यावर चोपदार हातात भगवी पताका घेऊन बसलेले. सर्वांच्या नजरा चोपदार दंड उंचावून इशारा कधी देत आहेत याकडे लागलेल्या.

अखेर चोपदारांनी दंड उंचावून रिंगण सुरू झाल्याचा इशारा दिला. दोन्ही अश्व तुफान वेगाने रथापासून पुढे दुतर्फा उभ्या असलेल्या वारकऱ्यांच्या मानवी साखळीतील शेवटच्या दिंडीपर्यंत पोहचले आणि पुन्हा त्याच वेगाने परत माऊलींच्या चांदीच्या रथापर्यंत पोहचले. अश्र्वांच्या टापांचा आवाज टाळ मृदंगाच्या आवाजात आपलेही अस्तित्व तेवढ्याच दिमाखात सिद्ध करत होता.

शेवटी एकच गर्दी उसळली ती अश्र्वांच्या टापाखालची माती आपल्या कपाळी लावण्यासाठी. माऊलींचे अश्व ज्या मार्गावरून धावत गेले त्या जागेवर फुगड्या, उंच उड्या मारून अखंड वारकऱ्यांनी रिंगण सोहळ्याचा आनंद साजरा केला.

रथापुढे आल्यानंतर दोन्ही अश्र्वांना पेढ्याचा प्रसाद भरवला आणि चोपदारांनी चांदीचा राजदंड उंचावत रिंगण सोहळा पार पाडल्याचे संकेत देताच लाखो वैष्णव तरडगावच्या दिशेनं मुक्कामासाठी मार्गस्थ झाले. केवळ आठ किलोमीटरचे सर्वांत छोटे अंतर असलेला हा टप्पा आहे.

भान हरपून खेळ खेळतो ।

दंगतो भक्तीत वैष्णवांचा मेळा ||

भक्तिने भारलेला रिंगण सोहळा |

पाहावा याचि देही याचि डोळा ||

आळंदी- पंढरपूर वारीतील विशेष महत्व असलेला रिंगण सोहळा या वर्षीही वारकऱ्यांसाठी वारीचा आनंद व्दिगुणीत करणारा ठरला. एक नवी ऊर्जा यातून वारकऱ्यांना पुढील वारीसाठी मिळाली. रिंगण सोहळा पाहण्यासाठी लाखो भाविकांची गर्दी झाली होती.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT