साताऱ्यात मुख्य रस्त्यावर मांडलेले मंडई Pudhari Photo
सातारा

दिसला चौक की थाटला बाजार

सातार्‍यात ठिकठिकाणी नोकरदारांचा वेळ हेरून भरतेय भाजी मंडई

पुढारी वृत्तसेवा

सातारा : पुढारी वृत्तसेवा

शहराचा विस्तार अगदी झपाट्याने वाढत आहे. पूर्वी एखादी छोटी वस्तू घ्यायची म्हटली तरी उपनगरातील नागरिकांना शहरात यावे लागत होते. परंतु, आता तशी परिस्थिती राहिली नाही. लोकांच्या गरजा ओळखून अनेकांनी वेगवेगळे व्यवसाय थाटले. त्यापैकीच एक म्हणजे रोजच्या जेवणातील भाजी होय. शहरातील चौकाचौकांमध्ये सध्या भाजी मंडई बहरली असल्याचे दिसून येत आहे. नोकरदारांचा वेळ आणि भाजी विक्रीतून होणारी उलाढाल मोठी असल्यामुळे सध्या भाजी विक्री व्यवसायात अनेकांनी उडी घेतली आहे. त्यामुळे अगदी शहराच्या उपनगरातही सकाळ आणि संध्याकाळ भाजी मंडईतील किलबील ऐकायला मिळत आहे.

शहरामध्ये प्रामुख्याने राजवाडा, रविवार पेठ, महात्मा फुले आणि जुना मोटार स्टँड भाजी मंडईचा त्यामध्ये समावेश आहे. या मंडईमध्ये खरेदीसाठी विशेषत: रविवार आणि गुरुवारी गर्दी होते. त्यामुळे इतर दिवशी या मंडई अक्षरश: ओस पडतात. त्यामुळे केवळ दोनच दिवस व्यवसाय होत असल्यामुळे हातावर पोट असणार्‍या विक्रेत्यांनी शहर व उपनगरातील मुख्य चौकाचे ठिकाण हेरले आहे. चौकाच्या ठिकाणी नेहमी गर्दी असते. त्यामुळे कोणत्याही कोपर्‍यात भाजी विक्रीस बसलो तर चांगला व्यवसाय होणार, हे माहीत असलेल्या विक्रेत्यांनी शहरातील असा कोणताच चौक सोडलेला नाही.

मोळाचा ओढा, राधिका टॉकिज, बसस्थानक परिसर, समर्थ मंदिर, सीटी पोस्ट कार्यालय, पोवई नाका, गोडोली नाका, भूविकास बँक, जुना आरटीओ कार्यालय, वाढे फाटा, बॉम्बे रेस्टॉरंट चौक, शिवराज पेट्रोल पंप या ठिकाणी सध्या भाजी विक्रेत्यांनी आपले बस्तान बसवले आहे. कमी वेळात जास्त पैसा मिळत असल्याने भाजी विक्रीकडे पर्यायी व्यवसाय म्हणून पाहिले जात आहे. शहरात मिळणार्‍या भाज्यांपेक्षा उपनगरात मिळणार्‍या भाज्यांचे दरही दुपटीने असतात. 50 रुपये किलो दराने मिळणारे कांदे उपगनराच्या चौकातील भाजीमंडईत 60-70 रुपये किलोने विकले जात आहेत. तर इतर भाजीपाल्यामध्ये पावशेर मागे 5-10 रुपये जास्त काढले जात आहेत. उपगनरात राहणारा बहुतांशवेळा कामगार वर्ग असतो. सायंकाळी कामावरून आल्यानंतर शहरात जाण्यापेक्षा जवळच्या जवळ भाजी खरेदी करण्याकडे अनेकांचा कल असतो.

जागेवरून वादावादीचे प्रसंग...

काही ठिकाणी चौकात भाजी विक्रीस बसण्यावरुन अनेकदा विक्रेत्यांमध्ये वादावादीचे प्रकारही घडले आहेत. हे वाद पोलिस ठाण्यापर्यंत पोहोचले आहेत. स्थानिक नगरसेवक किंवा एखाद्या सामाजिक कार्यकर्त्याला हाताशी धरून चौकामध्ये जागा मिळवली जाते. एखादा नवखा विक्रेता त्या ठिकाणी आल्यास त्याला हुसकावून लावले जाते. त्यामुळे ओळखीच्याच व्यक्तीला चौकामध्ये भाजी विक्रीस जागा मिळते.

वाहतुकीची कोंडी नित्याचीच...

चौकाचौकांमध्ये भाजी मंडई भरू लागल्याने वाहतुकीची कोंडी नित्याचीच बनली आहे. काहीवेळेला छोटे-मोठे अपघातही होत आहेत. त्यामुळे अशा ठिकाणी मंडई विक्रीस धोका निर्माण झाला आहे. प्रत्येक चौकात पोलिसांना बंदोबस्त ठेवणे शक्य नाही. मात्र, ज्या त्या परिसरातील नागरिकांनी आपापल्या चौकातील सुरक्षेच्या उपाययोजना कराव्यात, असे पोलिसांचे म्हणणे आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT