सातारा : पुढारी वृत्तसेवा
घरोघरी दिवाळी सणासाठी सज्जता होऊ लागली आहे. कुठे साफसफाई, तर कुठे रंगरंगोटीच्या कामांना वेग आला आहे. सणासाठी कपडे, किराणा साहित्याची खरेदी केली जात आहे. फराळाची तयारी युध्दपातळीवर सुरु आहे. तर चिमुकल्यांची लुडबूड टाळण्यासाठी शाळांना सुट्ट्या लागण्यापूर्वीच घरातील आवराआवरी करण्याला प्राधान्य दिले जात आहे. आकाशकंदील, पणत्या, उटणे, रांगोळी आदी साहित्यामुळे बाजारपेठेतही दीपोत्सावाची चाहूल जाणवत आहे.
दिवाळी अवघ्या काही दिवसांवर आल्याने सर्वत्र तयारीला वेग आला असून विशेषत: महिलावर्गाची धांदल उडाली आहे. घराची साफसफाई, तर कुठे रंगरंगोटीची कामे सुरु असून दिवाळी फराळाच्या पूर्वतयारीला वेग आला आहे. दिवाळीच्या फराळासाठी महिलांकडून घरगुती पदार्थांना प्राधान्य दिले जात असल्याने किराणामालाच्या खरेदीसह पाककलेला उधाण आले आहे. दिवाळीत आपले कौशल्य पणाला लावून स्वादिष्ट व खमंग पदार्थ तयार केले जातात. त्याची पूर्वतयारी केली जात असून चकली भाजणी, लाडू, अनारसे आदी पिठे तयार करण्यात येत आहेत. घरातील कामांमध्ये लहानग्यांची लुडबूड होत असते. परंतू महिलांना लवकर कामे उरकण्यावर भर दिला जात असल्याने कोणाचाच हस्तक्षेप नको असतो. शाळांना सुट्ट्या लागण्यापूर्वीच स्वच्छता व फराळाची पूर्वतयारी केली जात आहे, तर चिमुकल्यांची परीक्षा सुरु असल्याने त्यांना सुट्टीचे वेध लागले आहेत. कपडे, इलेक्ट्राॉनिक्स वस्तूंसह सातारा शहरात ठिकठिकाणी आकर्षक आकाशकंदील, पणत्या, रांगोळी, दिवाळी किट विक्रीसाठी उपलब्ध झाल्याने बाजारपेठेतही दिवाळीची चाहूल जाणवत आहे.
जीवनावश्यक वस्तूंसह सर्वच खरेदीला महागाईच्या झळा बसत आहेत. खाद्यतेलाच्या किमती वाढल्या आहेत. त्यामुळे दिवाळीच्या खरेदीला आर्थिक फोडणी बसणार असली तरी लाडक्या बहिणींना तीन सिलिंडर मोफत मिळणार असल्याने गृहिणींना दिलासा मिळाला आहे. मोफत मिळालेल्या गॅसवर लाडूसह चिवडा, चकली तळली जाणार असल्याने फराळाची गोडी वाढणार आहे.