MSP Hike | शेतकऱ्यांना दिवाळी गिफ्ट!, गहू, हरभऱ्यासह अनेक पिकांची MSP वाढवली
पुढारी ऑनलाईन डेस्क : केंद्रीय मंत्रिमंडळाने आगामी पणन हंगाम २०२५-२६ साठी ६ रब्बी पिकांच्या किमान आधारभूत किमतीत (MSP) वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. शेतकऱ्यांना चांगल्या उत्पन्नाची शाश्वती मिळावी आणि रब्बी हंगामात प्रमुख पिकांच्या लागवडीला प्रोत्साहन देण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. बुधवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी हा निर्णय जाहीर केला. (MSP Hike)
गव्हाच्या आधारभूत किमतीत प्रतिक्विंटल २,२७५ रुपयांवरून २,४२५ रुपयांपर्यंत वाढ करण्यात आली आहे. ही वाढ गेल्या हंगामाच्या तुलनेत १५० रुपयांनी अधिक आहे. तसेच बार्लीची एमएसपी प्रतिक्विंटल १,८५० रुपयांवरून १,९८० रुपये केली आहे. हरभरा एमएसपी प्रतिक्विंटल ५,४४० रुपयांवरून ५,६५० रुपये, मसूर प्रतिक्विंटल ६,४२५ रुपयांवरून ६,७०० रुपये, मोहरी प्रतिक्विंटल ५,६५० रुपयांवरून ५,९५० रुपये करण्यात आली आहे.
MSP Hike : शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा
गहू, मोहरी, हरभरा यांच्या आधारभूत किंमतीत अनुक्रमे १५० रुपये, ३०० रुपये आणि २१० रुपये वाढ करण्यात आली आहे. शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा देण्यासाठी आणि विशेषत: आगामी रब्बी हंगामात शेतपिकांच्या उत्पन्नाला आधार देण्याच्या उद्देशाने पिकांच्या आधारभूत किमतीत वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कृषी मूल्य आणि किंमत आयोगाकडून (CACP) दरवर्षी पेरणीच्याआधी २२ पिकांसाठी एमएसपीची शिफारस केली जाते. यात १४ खरीप पिके आणि ७ रब्बी पिकांचा समावेश असतो. त्यानंतर केंद्रीय मंत्रिमंडळात त्यावर शिक्कामोर्तब केले जाते.

