Great Indian Bustard conservation Maharashtra File photo
सातारा

Great Indian Bustard conservation Maharashtra| दख्खनचे पठार ठरतेय अतिदुर्मीळ माळढोक पक्ष्याचे आश्रयस्थान

सातारा, आटपाडी व सांगोला परिसर संवर्धनासाठी महत्त्वाचा; वन्यजीव संस्थेच्या शास्त्रज्ञांनी केलेल्या संशोधनातून स्पष्ट

पुढारी वृत्तसेवा

सातारा : प्रवीण शिंगटे

वन्यजीव जगतात केवळ १०० ते १५० संख्या उरलेल्या अतिदुर्मीळ माळढोक पक्षाच्या अस्तित्वासाठी भारतातील दख्खनचे पठार हे अत्यंत महत्त्वाचे सुरक्षित आश्रयस्थान असल्याचे एका नव्या शास्त्रीय संशोधनातून समोर आले आहे. या अभ्यासात महाराष्ट्रातील साताऱ्यातील फलटण, सांगलीतील आटपाडी आणि सोलापूर जिल्ह्यातील सांगोला, मंगळवेढा या परिसरांचे माळढोक संवर्धनातील अनन्यसाधारण महत्त्व आहे.

भारतीय वन्यजीव संस्थेचे शास्त्रज्ञ शाहीर खान, डॉ. गौतम तालुकदार आणि डॉ. बिलाल हबीब यांचा महाराष्ट्र वनविभागाच्या सहकार्याने केलेल्या या संशोधनाचा अहवाल आंतरराष्ट्रीय शोधपत्रिका प्लाज वनमध्ये प्रसिद्ध झाला आहे.

दख्खनच्या पठारावरील महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगणा आणि आंध्र प्रदेश या चार राज्यांमधील एकूण ७,२०,००० चौ.कि.मी. क्षेत्रापैकी केवळ ४८,००० चौ.कि.मी. क्षेत्र माळढोक पक्ष्यांसाठी पर्यावरणीयदृष्ट्या अनुकूल आहे. या संपूर्ण प्रदेशात १६ प्रमुख प्राधान्य संवर्धन क्षेत्रे निश्चित करण्यात आली आहेत. आटपाडी आणि सांगोला परिसरातील १४४ चौ.कि.मी.च्या प्राधान्य ग्रिडमध्ये ७०.४ टक्के चालू पडिक जमीन आणि १३.१ टक्के माळरान/गायरान असल्याचे आढळले. जिथे स्थानिकांनी माळढोकचा वावर स्पष्टपणे नोंदवला आहे.

सातारा जिल्ह्यातील फलटण व पिंपरी परिसरातील १४४ चौ. किमीच्या प्राधान्य क्षेत्रात ५२.८ टक्के पडिक जमीन आणि ३४.१ टक्के माळरान आहे. या ग्रिडमध्ये विजेच्या उघड्या तारांची लांबी ० किमी नोंदवली गेली आहे. ज्यामुळे हा भाग पक्ष्यांसाठी अत्यंत सुरक्षित मानला गेला आहे.

सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा-नांदेश्वर ७२० चौ. कि.मी. आणि सोलापूर-धाराशिव जोडणारा विशाल भाग ८,४९६ चौ.कि.मी. हे माळढोकचे सर्वात मोठे प्राधान्य संवर्धन क्षेत्र म्हणून समोर आले आहेत. संशोधनात आढळले की, प्राधान्य संवर्धन क्षेत्रांमध्ये चालू पडिक जमिनी २८.६ टक्के, खरीप पिके २४.३ टक्के आणि नैसर्गिक माळराने ११.६ टक्के यांचे प्रमाण जास्त आहे.

मानवी वस्ती असलेल्या या प्रदेशात पावसाळ्यात खरीप पिके मुबलक कीटक व अन्न पुरवतात, तर लगतची माळराने पक्ष्यांना घरटी बांधण्यासाठी व प्रजननासाठी मोकळी जागा देतात. परंतु, पारंपरिक अन्नधान्य व कडधान्यांच्या शेतीकडून उसासारख्या जास्त पाण्याच्या व घनदाट नगदी पिकांकडे होणारा बदल, माळरानावरील विजेच्या तारांचे वाढते जाळे आणि औद्योगिकीकरण यामुळे या पक्ष्यांचे अधिवास धोक्यात आले आहेत.

भविष्यातील माळढोक पुनरुज्जीवनाची दिशा

राजस्थानमध्ये केंद्र सरकार, राजस्थान सरकार आणि डब्लूआयआयद्वारे चालवल्या जाणाऱ्या कृत्रिम प्रजनन केंद्रातून भविष्यात जन्माला येणाऱ्या माळढोक पक्ष्यांना नैसर्गिक अधिवासात मुक्त करण्यासाठी दख्खनचे पठार, विशेषतः महाराष्ट्रातील आटपाडी, सांगोला व फलटणचे माळरान सर्वात योग्य पुनर्वसन क्षेत्र ठरु शकते.

माळढोक वाचवणे म्हणजे केवळ एका पक्षाचे रक्षण करणे नसून दख्खनच्या माळरान परिसंस्थेचे आणि पारंपरिक कोरडवाहू शेतीचे रक्षण करणे आहे. विजेच्या तारांवर बर्ड पत्त्नाईट डायव्हर्टर बसवणे आणि स्थानिक शेतकऱ्यांच्या सहभागातून पारंपरिक पडिक जमिनींचे जाळे जपणे ही या दुर्मीळ पक्षाला नामशेष होण्यापासून वाचवण्याची अंतिम संधी आहे.

- चिन्मय सावंत, युवा वन्यजीव संवर्धक व आयोग सदस्य

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT