Death due to the arbitrariness of the gas, contractor company
वहागाव : येथे गावामध्ये प्रवेश करणार्‍या मुख्य रस्त्यापाशी गेल्या दीड वर्षांपासून गॅस गंपनीने खड्डा काढून ठेवला आहे.  Pudhari Photo
सातारा

गॅस, ठेकेदार कंपनीच्या मनमानीपणामुळे मरणयातना

पुढारी वृत्तसेवा

तासवडे टोलनाका : प्रवीण माळी

महामार्गाचे रुंदीकरण करण्यासाठी ठेकेदार कंपनीकडून सुमारे एक वर्षापासून जागोजागी खोदकाम करत आहे. या खोदकामासह गॅस पाईप लाईनसाठी सुद्धा खोदकाम केले जात असून धोकादायक पद्धतीने महामार्गालगतच्या सेवा रस्त्याकडेला खड्डे काढून ते महिनामहिना तसेच ठेवले जातात असा अनुभव आहे. महामार्ग ठेकेदार कंपनीसह गॅस पाईप लाईन टाकणारी कंपनी स्थानिकांच्या बोकांडीवर बसली असून, या कंपन्या सामान्यांना जगू देणार का ? असा संतप्त प्रश्न उपस्थित होत आहे.

शेंद्रे ते कागल महामार्गाच्या सहापदरीचे काम मागील एक वर्षापासून सुरू झाले आहे. तत्पूर्वी दीड वर्षापासून सातारा ते पेठ नाका या दरम्यान महामार्गालगत गॅस पाइप लाईनचे काम चालू आहे. गॅस कंपनीकडून काम करत असताना शेतकर्‍यांच्या शेतामध्ये तब्बल दहा फुटाखाली खोदकाम करून गॅसची पाईप टाकण्यात आली आहे. महामार्गाच्या व शेतकर्‍यांच्या हद्दी दरम्यानच गॅस कंपनीने आपली गॅसची पाईप टाकली आहे. गेल्या दीड वर्षापासून गॅस कंपनीचे काम चालू आहे. परंतु अद्यापही काही ठिकाणी संपले नाही. दीड वर्षापासून महामार्गा लगत काम सुरू असले तरी आजपर्यंत महामार्ग प्राधिकरणाचा एकही अधिकार या कामाकडे फिरकला नाही. असे स्थानिकांनी सांगितले आहे.

ठेकेदार कंपनीने अनेक ठिकाणी महामार्गाचे काम करताना मोठ्या प्रमाणावर खोल चर व खोदकाम करत आहे. महामार्गाचे रुंदीकरण करत असताना अनेक रस्ते बंद करत तात्पुरती मलमपट्टी लावत सेवा रस्ते केले आहेत. यावरून जात असताना स्थानिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. तर दुसरीकडे गॅस कंपनीने खोदकाम करून ठेवलेल्या खड्ड्यामुळे स्थानिक त्रस्त झाले आहेत. गॅस कंपनीचे बर्‍यापैकी काम पूर्ण झाले असले तरी अजूनही कराड तालुक्यात वहागाव, कराड मलकापूर दरम्यान या ठिकाणी काम सुरूच आहे. वहागाव येथे सेवा रस्ता गावाच्या मुख्य रस्त्याला मिळतो, त्याच ठिकाणी एक वर्षापूर्वी तब्बल दहा फूट खड्डा खाणून ठेवला आहे. या खड्ड्यामुळे सेवा रस्त्यावर अनेकदा वाहतूक कोंडी होते. त्याबरोबरच खड्ड्यातील खडी, मुरूम हा सेवा रस्त्यावर ठेवला आहे. त्यामुळे वहागावसह परिसरातील अनेक स्थानिक दुचाकीस्वारांचे जात असताना येथील खडी व मुरुमावरून घसरून हातपाय मोडले आहेत.

कराड व मलकापूर दरम्यान वारणा हॉटेल शेजारीच सेवा रस्त्याला गेल्या दोन महिन्यापासून गॅस कंपनीचे काम चालू आहे. गॅस कंपनीकडून पाईप लाईन जमिनीत गाडून नेण्यासाठी आधुनिक मशीन लावण्यात आलेली आहे. ही मशीन सेवा रस्त्याला खेटूनच लावण्यात आले आहेत. त्याचवेळी ठेकेदार कंपनीकडून महामार्गाच्या कराड व मलकापूर या उड्डाण पुलाचे काम सुरू आहे. उड्डाण पुलामुळे या ठिकाणची वाहतूक दोन्ही बाजूच्या सेवा रस्त्यावरून वळवण्यात आली आहे. यामुळे सेवा रस्त्यावर मोठ्या प्रमाणात नेहमीच वाहतूक कोंडी असते. या ठिकाणी सेवा रस्ते अगोदरच अरुंद आहेत. त्यात महामार्ग ठेकेदार कंपनीचा मनमानी कारभार त्यामुळे वाहतुकीच्या नेहमीच तीन तेरा अन् नऊ बारा वाजलेल्या असतात.

अनेक महिन्यांपासून उड्डाण पुलाचे काम सुरू असून त्याबरोबरच गॅस कंपनीचेही काम सुरू आहे. दोन्ही ठेकेदार कंपन्या मनमानी कारभाराने स्थानिकांना प्रचंड त्रास देत आहेत. सेवा रस्त्यावर रोज वाहनांच्या रांगा लागलेल्य असतात. या परिस्थितीमुळे परिसरातील नागरिकांनी मलकापूर बाजारपेठेकडे पाठ फिरविली असून याचा आम्हाला मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
- अमोल माने, व्यावसायिक, मलकापूर कराड
SCROLL FOR NEXT