Chief Minister Tirth Darshan Yojana | मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेला आचारसंहितेमुळे ब्रेक Pudhari Photo
सातारा

Chief Minister Tirth Darshan Yojana | मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेला आचारसंहितेमुळे ब्रेक

जिल्ह्यातील 850 ज्येष्ठांना प्रतीक्षा; अयोध्येला जाण्याचा ध्यास

पुढारी वृत्तसेवा

सागर गुजर

सातारा : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेला ब्रेक लागला आहे. जिल्ह्यातील 850 ज्येष्ठ नागरिकांनी या योजनेत सहभाग नोंदवला आहे. या सर्वांना अयोध्या दाखवली जाणार आहे. यापैकी अनेकजण वर्षभरापासून अयोध्येला जाण्याच्या प्रतीक्षेत आहेत.

मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेचा शासन निर्णय जारी करण्यात आला आहे. 60 वर्षांवरील नागरिकांना योजनेचा लाभ घेता येणार असून, देशभरातील 66 तीर्थक्षेत्रांसाठी योजना लागू करण्यात आली आहे. या योजनेचा लाभ घेणार्‍या प्रवाशांना 30 हजारांपर्यंत अनुदान मिळणार आहे. तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेची घोषणा केली होती. महाराष्ट्र सरकारनं मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेंतर्गत 60 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना मोफत तीर्थयात्रेची सुविधा उपलब्ध करुन देण्याचं काम सुरूकेलं आहे.

या योजनेचा लाभ घेण्यासाठी त्यांनी देशभरातील 73 आणि महाराष्ट्रात 66 धार्मिक स्थळांची यादी केली आहे. मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेंतर्गत 60 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना मोफत तीर्थ यात्रेची सुविधा देण्यासाठी महाराष्ट्र सरकारनं देशभरातील 73 आणि राज्यातील 66 अशा 139 धार्मिक स्थळांची यादी तयार केली आहे. दरम्यान, गेल्या आठवड्यातच राज्य मंत्रिमंडळानं मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेला मंजुरी दिली.

दरम्यान, 2.5 लाखांपर्यंत वार्षिक उत्पन्न असल्याच्या पात्र व्यक्तींना प्रवास, निवास आणि भोजन खर्च कव्हर करण्यासाठी 30 हजार रुपये 75 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या अर्जदारांना जोडीदार किंवा परिजनांसोबत येण्याची परवानगी आहे. राज्यस्तरावर योजनेचं परीक्षण आणि आढावा घेण्यासाठी 17 सदस्यीय समिती स्थापन करण्यात आली आहे. जिल्हा स्तरावर सामाजिक न्याय विभागाचे सहायक आयुक्त सदस्य सचिव म्हणून सात सदस्यीय समिती स्थापन करण्यात आली आहे. राज्यस्तरावर सामाजिक न्याय विभागाचे आयुक्त नोडल अधिकारी म्हणून काम पाहत आहेत.

या तीर्थक्षेत्रांचाही आता समावेश...

तीर्थक्षेत्रांमध्ये वैष्णोदेवी मंदिर, अमरनाथ यात्रा, अमृतसरमधील सुवर्ण मंदिर, चार धाम यात्रा, अयोध्येतील राम मंदिर, द्वारकामधील सोमनाथ मंदिर आणि ओडिशातील जगन्नाथ पुरी या प्रमुख धार्मिक स्थळांचा समावेश होतो. याशिवाय तामिळनाडू, केरळ आणि कर्नाटकातील धार्मिक स्थळं तसेच महत्त्वाच्या बौद्ध आणि जैन स्थळांचाही समावेश आहे. त्याचबरोबर मुंबईतील 15 धार्मिक स्थळंही या यादीत आहेत. यामध्ये सिद्धिविनायक मंदिर, चैत्यभूमी, विपश्यना शिवालय, एक आराधनालय, वांद्रे येथील माउंट मेरी चर्च आणि सेंट अँड्य्रूज चर्च, याशिवाय नाशिकमधील जैन मंदिर आणि नागपुरातील दीक्षाभूमी, जिथे आंबेडकरांनी बौद्ध धर्म स्वीकारला ही स्थळे या योजनेत घेण्यात आली आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT