

सातारा : शाहूपुरी येथे घरासमोर जाऊन जेवण, पाणी देण्याची विनंती करून अज्ञात महिलेने तोंडावर स्प्रे मारून बेशुद्ध करत गृहिणीच्या अंगावरील सोन्याच्या ऐवजाची चोरी केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे साताऱ्यात खळबळ उडाली असून पोलिस तपास करत आहेत.
रंजना मोहन जाधव (वय 55, रा. शाहूपुरी) यांनी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. ही घटना दि. 7 डिसेंबर रोजी घडली आहे. तक्रारदार महिला घरी असताना अनोळखी साधारण 45 वर्षांची महिला तेथे आली. या महिलेने तक्रारदार महिला रंजना जाधव यांना सुरुवातीला भूक लागल्याचे सांगून जेवण मागितले. तक्रारदार महिलेने थांबण्यास सांगून जेवण आणून देण्यासाठी घरात गेली, त्याचवेळी अनोळखी महिला घरात शिरली व पाणी पाहिजे, असे म्हणाली. तक्रारदार महिला जेवण व पाणी देत असताना अनोळखी महिलेने तोंडावर स्प्रे मारला.
अनोळखी महिलेने स्प्रे मारल्यानंतर तक्रारदार महिला रंजना जाधव या बेशुद्ध पडल्या. या घटनेनंतर अनोळखी महिलेने तक्रारदार महिलेच्या अंगावरील गळ्यातील, कानातील सोन्याचा सुमारे 25 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. तक्रारदार महिलेला शुद्ध आल्यानंतर सोन्याची चोरी झाल्याचे लक्षात आले. या घटनेनंतर तक्रारदार कुटुंबीय भयभीत झाले. शाहूपुरी पोलिसात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.