मायणी : पुढारी वृत्तसेवा
धोंडेवाडी, ता. खटाव येथे शनिवारी रात्री चोरीच्या उद्देशाने गावात घुसलेल्या चोरट्यांना धोंडेवाडी ग्रामस्थांनी पोलिसांच्या ताब्यात दिले. ग्रामस्थांनी जीवावर उदार होऊन ज्या चोरट्यांना पकडून दिले त्या चोरट्यांवर तकलादू कारवाई करून नोटीस बजावून त्यांना सोडून दिल्याचा प्रकार समोर आला आहे. त्यामुळे पोलिसांच्या कारभारावरच प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, धोंडेवाडी येथे एका ढाब्याच्या आडोशाला शनिवारी मध्यरात्री 1 ते 2 वाजण्याच्या दरम्यान 20 ते 22 वयोगटातील दोन तरुण तोंडाला रुमाल बांधून दबा धरून उभे असल्याचे काही गावकर्यांना दिसले. संबंधित युवकांना हटकले असता पळून जाण्याच्या तयारीत होते. त्यामुळे गावकर्यांचा संशय बळावला आणि त्या दोघांना ताब्यात घेतले. तेव्हा त्यांच्याकडून एक कटर, इलेक्ट्रिक केबल तार, बॅटरी इत्यादी साहित्य सापडले. परंतु बाकीचे त्यांचे साथीदार पळून जाण्यात यशस्वी झाले. त्यामुळे ते कुठेतरी डल्ला मारण्याच्या तयारीत असल्याचे लक्षात आल्याने ग्रामस्थांनी मायणी पोलिसांना फोनवरून माहिती दिली. त्यानंतर घटनास्थळी पोलिस उपनिरीक्षक अमोल कदम व कर्मचारी प्रवीण सानप येताच ग्रामस्थांनी त्या दोन चोरट्यांना पोलिसांच्या ताब्यात दिले. मात्र या घटनेची नोंद करण्यास पोलिसांकडून विलंब होत गेला. शनिवारी रात्री सापडलेल्या चोरट्यांवर गुन्हा दाखल होण्यासाठी रविवारी सायंकाळपर्यंत ग्रामस्थांना वाट पहावी लागली. गुन्हा दाखल झाल्यानंतर काही तासातच पोलिसांनी चोरट्यांवर तकलादू कारवाई करत नोटीस बजावून त्यांना सोडून दिले.
गुन्हा नोंद झाल्याच्या काही तासानंतरच हे चोरटे वडूज बसस्थानक परिसरात आढळून आल्याचे सोशल मीडियावर फोटो वायरल होताच सर्वत्र खळबळ उडाली. हे फोटो व्हायरल झाल्यानंतर पोलिसांच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. याबाबत पोलिस प्रशासनाशी संपर्क साधला असता पोलिस प्रशासनाने संबंधित चोरट्यांवर महाराष्ट्र पोलिस अधिनियम 1951 चे कलम 122 अंतर्गत गुन्हा दाखल करून त्यांना नोटीस बजावून सोडून देण्यात आल्याचे सांगितले. पोलिसांच्या या कारवाईमुळे धोंडेवाडीसह मायणी परिसरातून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.
दरम्यान, चितळी, मायणी, पडळ, धोंडेवाडी इत्यादी ठिकाणी चोरीचे सत्र सुरू असून पोलिसांसमोर या चोरट्यांनी आव्हान उभे केले आहे. मात्र ग्रामस्थांनी जीवावर उदार होऊन पकडून दिलेल्या चोरट्यांवर तकलादू कारवाई करून नोटीस बजावून पोलिस चोरट्यांना सोडून दिल्याने पोलिसांच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.