महापालिकेच्या वित्त व लेखा विभागातून रुग्णालयातील साफसफाईच्या कामांच्या बिलांची फाइल ठेकेदाराच्या कर्मचार्यानेच चोरी केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी महापालिकेत साफसफाईच्या कामाचा ठेका असलेल्या लोकराज्य सेवा सहकारी संस्थेच्या प्रतीक गिरी याच्यावर शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महापालिकेच्या मुख्य लेखा व वित्त विभागातील वरिष्ठ लिपिक मनोज बिडकर यांनी तक्रार दिली आहे. पालिकेच्या सर्व शाखांचे बिल तपासणी करून या विभागामार्फत बिले दिली जातात. त्यानुसार गत महिन्यात पालिकेच्या रुग्णालयांची यांत्रिकी पध्दतीने साफसफाई करून घेण्याच्या कामाचे निविदा बिल फाइल आरोग्य खात्याकडून बिडकर यांच्याकडे दि. 6 ऑगस्टला आली होती. त्यानंतर ही फाइल गायब झाल्याचे समोर आले होते. याबाबत संपूर्ण विभागात शोध घेतल्यानंतरही फाइल सापडली नाही. त्यानंतर या विभागातील सीसीटीव्ही कॅमेरे तपासण्यात आले. त्यात लोकराज्य सेवा सहकारी संस्था यांचा देखरेख करणारा कर्मचारी गिरी याने संबंधित फाइल चोरून नेल्याचे दिसले. याबाबत गिरी याने फाइल नेल्याचे मान्य केले. तसेच ही फाइल पुन्हा आणून दिली. मात्र, ही फाइल नक्की कशासाठी चोरी करण्यात आली होती, तिचा काही गैरवापर करण्यात आला आहे का ? हे स्पष्ट होऊ शकलेले नाही. याबाबत आता शिवाजीनगर पोलिसांकडून चौकशी करण्यात येत आहे.
दरम्यान, महापालिकेत साफसफाईच्या कामांचा ठेका मिळविण्याच्या स्पर्धेतून हा प्रकार घडला असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. याप्रकरणी महापालिकेने पोलिसांत तक्रार दिली असली तरी हे गंभीर प्रकार थांबविण्यासाठी ठोस कारवाई महापालिका प्रशासनाकडून केली जाणार का ? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.