तुषार देशमुख
सणबूर ः सह्याद्रीच्या कडेकपारीत वसलेल्या निगडे, ता. पाटण गावातील शेतकऱ्यांना शेती करावी की नको असा प्रश्न पडला आहे. व्याघ्र प्रकल्पाच्या बफरझोनमध्ये मोठ्या प्रमाणात वाढलेली गव्यांची संख्या गावकऱ्यांच्या पिकांसाठी, जनावरांसाठी आणि सुरक्षिततेसाठी सर्वात मोठे संकट बनले आहे. रात्री-अपरात्री यांचा त्रास होताच; परंतु आता दिवसाढवळ्या शिवारात घुसणारे गवे शेतकऱ्यांच्या संपूर्ण रब्बी हंगामावर तुटून पडले आहेत. त्यामुळे अतोनात नुकसान झाल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.
बळीराजा शेतीत श्रमाचे सोने पेरतो आणि गवे क्षणार्धात त्याला मातीमोल करतात. शेतकरी वर्गाची ही व्यथा आता संतापात बदलू लागली आहे. भात, शाळू, भाजीपाला, बाजरी, तुर ही कष्टाने उभे केलेली प्रत्येक पिके गव्यांच्या हल्ल्याने चिरडली जात आहे याच दुःख शेतकऱ्यांना सतावत आहे. गेल्या काही दिवसांत कळपातुन भरकटलेल्या एका भल्यामोठ्या गव्याने अनेक शेतकऱ्यांवर अचानक हल्ले केल्याच्या घटना घडल्या आहेत. मनुष्यवस्तीच्या 100 ते 200 फुटांच्या अंतरावरूनच गवे मुक्तपणे फिरताना दिसत आहेत. त्यामुळे गावकुसात रात्रीच्या वेळी फिरणे अत्यंत धोक्याचे झाले आहे.
या सगळ्या परिस्थितीमुळे शेतकरी वर्ग पूर्णपणे असहाय्य बनला आहे. आर्थिक संकट, उत्पादनात घट, प्राणहानीची भीती आणि नुकसान भरपाईसाठी वनविभागाचे दरवाजे ठोठावण्याची कसरत या सर्वांनी निगडे गावातील शेतकऱ्यांचे दैनंदिन जीवन अतिशय कठीण केले आहे. शेतकऱ्यांचे तक्रारीचा सूर आता कठोर होत आहेत. वनखात्याकडे गव्यांना रोखण्यासाठी कोणतीही ठोस उपाययोजना नाही. वन विभागाकडून केवळ आश्वासने दिली जातात कृती मात्र शुन्य आहे पण गव्यांचा उपद्रव दिवसेंदिवस दुपटीने वाढतो आहे. शेतकरी भीतीच्या छायेत आहेत. परंतु, वनविभाग हातावर हात ठेवून बघ्याची भूमिका घेत आहे, असा आरोप गावकरी करत आहेत.