सातारा : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या सातारा विभागातील 11 आगारांतील एसटीबसमधून भाऊबीज सणानिमित्ताने अनेक बहिणींनी प्रवास केला. त्यामुळे दोन दिवसांत 3 कोटी 34 लाख 79 हजार रुपयांचा महसूल विभागाला प्राप्त झाला.
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या सातारा विभागातील सातारा, कराड, पाटण, वाई, महाबळेश्वर, पारगाव-खंडाळा, मेढा, फलटण, कोरेगाव, वडूज, दहिवडी या 11 आगारातून दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर जादा बसेस सोडण्यात आल्या होत्या. तसेच महिला सन्मान योजनेमुळे एसटीकडे महिला प्रवाशांचा ओढा मोठ्या प्रमाणात वाढला आहे. दिवाळी काळात 725 एसटी बसेसमधून जास्तीत जास्त प्रवासी वाहतुकीसाठी तत्कालीन विभाग नियंत्रक विकास माने यांच्यासह अन्य अधिकार्यांनी नियोजन केले होते. त्यामुळे मोठ्या प्रमाणात सर्व आगारातील बसेसमार्फत प्रवासी वाहतूक करण्यात आली.
दीपावली सणात भाऊबीज सणादिवशी दि. 23 ऑक्टोबर रोजी 1 कोटी 67 लाख 41 हजार रुपये दि. 24 ऑक्टोबर रोजी 1 कोटी 67 लाख 38 हजार 286 रुपये असे मिळून 3 कोटी 34 लाख 79 हजार रुपयांचा महसूल सवलतमूल्यासह सातारा विभागाला मिळाला आहे.
विभागातील सर्व चालक, वाहक, कार्यशाळा कर्मचारी, सफाई कामगार, प्रशासकीय, पर्यवेक्षकीय कर्मचारी, आगार व्यवस्थापक व सर्व अधिकार्यांच्या टीम वर्कमुळेच सातारा विभागास विक्रमी प्रवाशी उत्पन्न मिळाले आहे.ज्योती गायकवाड, विभाग नियंत्रक, सातारा