

कराड : जखिणवाडीतील युवकाच्या खून प्रकरणी कराड शहर पोलिसांनी पाच संशयितांना ताब्यात घेतले आहे. यापैकी दोन अल्पवयीन मुलांचा समावेश असून अन्य तिघांकडे रात्री उशिरापर्यंत कसून चौकशी सुरू होती. त्यामुळे त्यांना रात्री उशिरा अटक केली जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
एप्रिल 2025 मध्ये हनुमान जयंतीला यात्रेवळी बॅनर लावण्याच्या कारणावरून झालेल्या वादाचा राग मनात धरून जखिणवाडीतील प्रविण बोडरे या युवकाचा खून करण्यात आला आहे. शनिवारी सायंकाळी हत्या केल्यानंतर संशयितांनी पलायन केले होते. तेव्हापासून पोलिसांकडून संशयितांचा शोध सुरू होता. बुधवारी पोलिसांना संशयितांना ताब्यात घेण्यात यश आले आहे. ताब्यातील संशयितांपैकी दोघे अल्पवयीन आहेत. त्यामुळे उर्वरित तिघांकडे कसून चौकशी सुरू आहे. चौकशीतून दोषी आढळणार्यांना अटक केली जाणार असून संशयितांकडून माहिती घेण्याची कार्यवाही रात्री उशिरापर्यंत सुरू होती.