सातारा

सातारा : कर्ज राहिले बाजूला..अब्रूचे खोबरे वाट्याला

मोनिका क्षीरसागर

सातारा : विठ्ठल हेंद्रे
सातारा शहरासह जिल्ह्यात सायबर गुन्ह्यांचे प्रमाण वाढले असून, आता प्रामुख्याने महिला व युवतींना 'पर्सनल लोन' देतो, असे सांगून ब्लॅकमेल केले जात असल्याची धक्‍कादायक माहिती समोर आली आहे. दरम्यान, सायबर गुन्हेगारांच्या या नव्या फंड्यामुळे कर्ज राहतंय बाजूला आणि अब्रूचे खोबरे होतंय जादा, असा प्रकार घडत आहे. मोबाईल, इंटरनेट यामुळे चोरी, दरोड्याच्या संकल्पना आता अद्ययावत (अ‍ॅडव्हान्स) झाल्या आहेत. आपण मोबाईलवर ओटीपी दिल्यानंतर बँकेतून रक्‍कम परस्पर जाण्याच्या घटनांनी सायबर गुन्हेगारीचा आपल्याकडे प्रवेश झाला. आता यामध्येही सायबर चोरटे पुढे गेले असून, अनोळखी लिंक आल्यानंतर ती केवळ ओपन केली तर बँकेतून पैसे जाण्याचे प्रकार सर्रास घडत आहेत.

घर, वाहन तसेच अगदी चांगला मोबाईल घ्यायचा झाला तर आपल्याला अनेक बँका, मायक्रो फायनान्स लोन (कर्ज) द्यायला तयार आहेत. आता यामध्येही सायबर चोरट्यांनी मोहीम वळवली आहे. सातारा शहरात गेल्या आठ दिवसांपूर्वी एका महिलेने पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. तक्रारदार महिलेला कर्जाची गरज होती. यावेळी एका कंपनीचे नाव सांगून संबंधिताने लोन देतो, असे सांगितले. कागदपत्रे व केवळ फोटोवर लोन मिळत असल्याने महिलेने त्याबाबतची पूर्तता केली. पाच ते सहा दिवस ही प्रक्रिया सुरू राहिल्यानंतर काही प्रमाणात प्रोसेसिंग फीदेखील आकारण्यात आली.

पर्सनल लोन न मिळता संबंधितांकडून लगट होण्यासंबंधीचे फोन वाढू लागले. यामुळे महिला घाबरली. तिने लोन नको असल्याचे सांगत फोन बंद केला. यानंतर मात्र महिलेच्या मोबाईलवर तिचे अश्‍लील फोटो पडू लागल्यानंतर ती हादरून गेली. संबंधितांकडून ते फोटो कुटुंबीय व मित्र, मैत्रिणांना पाठविण्याची धमकीही देण्यात आली. अखेर प्रकरण हाताबाहेर जात असल्याचे पाहून महिलेने पोलिस ठाण्यात तक्रार दिली. सातार्‍यातील घडलेल्या या घटनेने महिला वर्गात खळबळ उडाली आहे. यामुळे फेक कॉल, फेक वेबसाईट यापासून महिलांनी खबरदारी घेण्याची गरज निर्माण झाली आहे.

सायबर पोलिस ठाणे अपडेट होणार का?

सध्या जिल्हानिहाय सायबर पोलिस ठाणे आहे. सातार्‍याला सायबरचे स्वतंत्र पोलिस ठाणे असून पूर्णवेळ त्यासाठी अधिकारी आहे. सायबरच्या अनेक घटना घडत असताना या विभागाकडून किती प्रमाणात गुन्ह्यांची उकल झाली? चोरी होणारे, गहाळ होणार्‍या मोबाईलची आकडेवारी किती आहे व त्यांचा छडा किती लागला? फसवणूक होऊन रकमा चोरी किती झाल्या व त्यातील किती जणांना पैसे परत मिळवून दिले? सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट करणार्‍या किती जणांवर कारवाई केल्या? याबाबतची माहिती समोर येणे गरजेचे आहे. चोरट्यांवर व समाजात तेढ करणार्‍यांवर जरब बसण्यास मदत होईल. मात्र, सायबरकडे अनेकदा आकडेवारी उपलब्ध नसते.

मोबाईल चोरीला.. गहाळ नोंदी.. तपास होता होईना..

शहरासह जिल्ह्यात दररोज पाच-दहा मोबाईल चोरी होत आहेत. मोबाईल चोरी झाल्यानंतर तक्रारदार पोलिस ठाण्यात जातात. मात्र, पोलिसांकडून बहुतेक प्रमाणात एफआयआर दाखल करून न घेता केवळ गहाळ नोंद करायला सांगतात. तक्रारदार पोलिसांचे ऐकून अर्ज विकत आणून तो भरून पोलिसांकडे देतात. पोलिस त्यावर गहाळ नोंद क्रमांक देऊन 'होईल तपास. तुम्ही जा,' असे सांगतात. दुर्दैवाने याचा तपासच होत नाही. एफआयआर असेल तपास होत आहे. मात्र, गहाळचा तपास रामभरोसे राहत आहे.

हेही वाचलत का ?

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT