पोलिसांच्या आशीर्वादानेच मटका जोमात (file photo)
सातारा

Matka Gambling Backed By Police | पोलिसांच्या आशीर्वादानेच मटका जोमात

गुन्हेगारीही वाढली : नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण

पुढारी वृत्तसेवा

हणमंत बर्गेे

पळशी : कोरेगाव शहरात रोज भेडसवणारी वाहतुकीची कोंडी, दिवसेंदिवस वाढत चाललेले अपघाताचे प्रमाण, गुंडाकडून होणारा सामान्य जनतेला त्रास, वाढती गुन्हेगारी हे सर्व रोखण्यास कोरेगाव पोलिसांना अपयश आले आहे. त्यातच आता शहरात कारवाईच्या नावाखाली बंद केलेला मटका व्यवसाय पुन्हा जोमाने सुरू करण्यात मात्र कोरेगाव पोलिसांना यश आले आहे. लोकप्रतिनिधींच्या पाठबळावर मटका व्यवसाय सुरू असल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे.

कोरेगाव शहरातील नागरिकांना वाहतुकीच्या समस्यांना रोज सामोरे जावे लागत आहे. सातारा ते पंढरपूर महामार्ग 24 मीटर रुंदीचा असतानाही कोरेगाव शहरातून मात्र नऊ मीटरचाच बनवण्यात आला आहे. त्यामुळे वाहतुकीची कोंडी ही समस्या कोरेगावकरांना कायम सहन करावी लागत आहे. वाहतुकीमुळे अपघाताचे प्रमाण वाढत चाललेले आहे. शहरातील पार्किंग व्यवस्थेकडे पोलिसांनी पूर्णतः दुर्लक्ष केले आहे. शहरात गुंडगिरीचे प्रमाण वाढत चाललेले आहे सामान्य नागरिकांवर शुल्लक कारणावरून दिवसाढवळ्या हल्ले होत आहेत. गुन्हेगारांना रोखण्यात व त्यांच्यावर कारवाई करण्यात पोलिस अपयशी ठरले आहे.

गुंडांना राजकीय पाठबळ मिळत असल्याने दिवसेंदिवस गुंडांची दहशत वाढत चालली आहे. अनेक वर्षे खुलेआम मटका ऑनलाईन लॉटरी आणि सोशल क्लबच्या नावाखाली पत्त्याचे डाव सुरू आहेत. यामुळे गल्लीत दिसणारी मटका दुकाने आता थेट रस्त्यावर टपरी टाकून खुलेआम सुरू करण्यात आली आहेत. टपर्‍यांमधून मटका दुकाने खुलेआम सुरु आहेत. ग्रामीण भागातील जनता, तरुण मुले झटपट पैसा मिळवण्याच्या हेतूने मटका आणि ऑनलाइन लॉटरीकडे वळत आहेत. यातून व्यसनाधीनता दिवसेंदिवस वाढत चालली आहे.

पोलिस निरीक्षक घनश्याम बल्लाळ यांनी काही दिवसांपूर्वी नागरिकांच्या वाढत्या तक्रारीमुळे शहरातील मटका व्यवसायावर थातूरमातूर कारवाई करत काही दिवस मटका बंद ठेवला. मात्र, काही दिवसातच हे मटका व्यवसाय पुन्हा सुरू झाले आहेत. पोलिस हे मात्र कार्यक्षेत्रात येत नसल्याचा दावा करत आहेत. मात्र,भर दिवसा वस्तीमध्ये हे व्यवसाय सुरू असल्याचे चित्र आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT