महाबळेश्वर : महाबळेश्वर गिरीस्थान नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुका सुरळीत व शांततेत पार पाडण्यासाठी प्रशासनाने सर्व तयारी केली आहे. मतदान केंद्रांची पाहणी, अधिकारी व कर्मचार्यांच्या नियुक्त्या, सुरक्षा व्यवस्थापन तसेच आवश्यक सुविधा उभारणीची कामे पूर्ण करण्यात आली आहेत.
निवडणूक निर्णय अधिकारी सचिन मस्के, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी योगेश पाटील तसेच पोलीस निरीक्षक बापूसाहेब सांडभोर यांनी स्वतः तयारीचा आढावा घेतला आहे. महाबळेश्वर नगरपरिषद निवडणुकीसाठी दि. 20 डिसेंबर रोजी प्रत्यक्ष मतदान होणार आहे. या निवडणुकीत पुरुष मतदार 6 हजार 105, महिला मतदार 6 हजार 598 व इतर 1 असा एकूण 12 हजार 704 मतदारांचा समावेश आहे.
निवडणुकीसाठी 10 प्रभागांमध्ये एकूण 17 मतदान केंद्रे स्थापन करण्यात आली आहेत. यासाठी 28 बॅलेट युनिट व 17 कंट्रोल युनिटची व्यवस्था करण्यात आली आहे. निवडणूक कामकाजासाठी 2 झोनल अधिकारी, 17 मतदान केंद्रांसाठी 17 केंद्राध्यक्ष व 3 राखीव असे एकूण 20 केंद्राध्यक्ष, 80 मतदान कर्मचारी व 20 पोलीस कर्मचारी असे सुमारे 122 कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत.
दिव्यांग मतदारांच्या सोयीसाठी प्रत्येक मतदान केंद्रावर व्हीलचेअरची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. मतदानाच्या दिवशी कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. या संपूर्ण निवडणूक प्रक्रियेसाठी निवडणूक निरीक्षक, निवडणूक निर्णय अधिकारी, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी, झोनल अधिकारी, केंद्राध्यक्ष तसेच सर्व नियुक्त कर्मचारी कार्यरत राहणार आहेत.