Fort Pratapgad
अफजलखान वधाच्या याच पुतळ्याचे काम अंतिम पातळीवर आहे.  Pudhari Photo
सातारा

प्रतापगडाच्या पायथ्याशी साकारणार अफजलखान वधाचा पुतळा

पुढारी वृत्तसेवा

सातारा : पुढारी वृत्तसेवा

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाने पावन झालेल्या प्रतापगडाच्या पायथ्याशी अफजलखान वधाचा 18 फुटांचा भव्य पुतळा साकारला जाणार आहे. प्रतापगडावर शिवाजी महाराजांनी वाघ नखांद्वारे अफजल खानाचा कोथळा काढून हिंदवी स्वराज्याचे रक्षण केले होते. यावर्षी छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला 350 वर्षे पूर्ण होत आहेत. यानिमित्ताने किल्ले प्रतापगडावर छत्रपती शिवाजी महाराज अफजलखानाचा कोथळा काढत असतानाचा पुतळा उभारला जाणार आहे. त्याचे काम पूर्ण होत आले असल्याने शिवप्रेमींमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

शिवप्रताप दिन

किल्ले प्रतापगडावर दरवर्षी शिवप्रताप दिन साजरा केला जातो. या दिनानिमित्त सरकारच्या वतीने प्रतापगडावर विविध कार्यक्रम आयोजित केले जातात. प्रतापगडावर छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजलखानाचा कोथळा बाहेर काढला तो दिवस शिवप्रतापदिन म्हणून साजरा केला जातो. शिवरायांच्या शौर्याच्या अनेक प्रसंगापैकी एक म्हणजे अफझलखानाचा वध हा आहे. त्यानिमित्तच प्रतापगड उत्सव म्हणजेच शिवप्रताप दिन साजरा केला जातो. 10 नोव्हेंबर 1659 रोजी झालेली प्रतापगडाची लढाई ही आजही शिवप्रेमींच्या कौतुकाचा विषय आहे. शिवाजी महाराजांनी स्वराज्यावर चाल करुन आलेल्या अफजलखानाला मोठ्या हुशारीने चर्चेचा प्रस्ताव देऊन प्रतापगडाच्या पायथ्याशी बोलावले. प्रतापगडाच्या पायथ्याशी उभारण्यात आलेल्या शामियान्यात शिवाजी महाराज आले तेव्हा अफजलखानाने त्यांच्याशी दगाफटका करण्याचा प्रयत्न केला. मात्र, सावध असलेल्या शिवरायांनी आपल्या हातातील वाघनखांनी अफजलखानाचा कोथळा बाहेर काढला आणि स्वराज्यावरील आदिलशाही आक्रमण परतवून लावले होते. प्रतापगडाच्या लढाईचा हा प्रसंग आजही शिवप्रेमींकडून आवर्जून नव्या पिढीला सांगितला जातो.

प्रतापगडाच्या पायथ्याशी हे शिवप्रताप स्मारक उभारण्यासाठी हिंदू एकता आंदोलन, सातारा आणि अन्य संघटनांकडून सरकारला विनंती करण्यात आली होती. मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी प्रतापगडाच्या पायथ्याशी पुतळा बसवण्याची घोषणा केली होती. आता येत्या महिनाभरात या पुतळ्याचे अनावरण केले जाण्याची शक्यता आहे. छत्रपती शिवाजी महाराजांकडून अफझलखान वधाचा प्रसंग जिवंत करणार्‍या या 18 फुटी पुतळ्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. हा पुतळा सध्या पुण्यात असून शिल्पकार दीपक थोपटे यांनी हा पुतळा तयार केला आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांचा असा असणार पुतळा

छत्रपती शिवरायांच्या या पुतळ्याजवळ लाईट आणि साऊंड शो असणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज व अफजलखानाच्या पुतळ्याची उंची 18 फूट इतकी आहे. या पुतळ्याचे अंदाजे वजन 7 ते 8 टन इतके आहे. हा पुतळा बनवण्यासाठी साधारण 9 महिन्यांचा कालावधी लागला आहे. शिल्पकार दीपक थोपटे यांच्या मार्गदर्शनाखाली 15 कारागिरांच्या अथक मेहनतीतून हा पुतळा साकारण्यात आला आहे.

अफजलखानाच्या कबरीचा वाद

अफलजलखानाची कबर प्रतापगडाच्या पायथ्याशी आहे. या कबरीवरून आतापर्यंत अनेकदा वाद झाला आहे. हिंदुत्ववादी संघटनांकडून अनेकदा अफजलखानाची कबर उकरण्याचा इशारा देण्यात आला आहे. या गडाच्या पायथ्याला असलेल्या अफजल खानाच्या कबरीमुळे प्रतापगडाकडे आणि या उत्सवाकडे सर्वांचे लक्ष असते. कबरीलगतचे बेकायदेशीर बांधकाम प्रशासनाने आता हटवलेले आहे. हिंदुत्ववादी संघटनांनी उपस्थित केलेल्या वादानंतर शिवप्रताप दिन उत्सव आता सरकारच्या वतीने साजरा केला जातो.

SCROLL FOR NEXT