विठ्ठल हेंद्रे
सातारा : साताऱ्यात अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला सुरुवात झाल्यानंतर पोलिस दलही खुश होते. रोजच्या दगदगीतून विचारांची मशागत होणार या विचाराने अनेक पोलिस हरकून टुम्म होते. हो खरंच सांगतोय. सातारचे तत्कालीन डीवायएसपी व सध्याचे फोर्स वनचे पोलिस अधीक्षक गजानन राजमाने यांनी स्वत: खांद्यावरचे स्टार हे पुस्तक लिहिले आहे.
या संमेलनात ते सहकुटुंब सहभागी झाले. दुसरे उदाहरण म्हणजे निवृत्त आयपीएस डॉ. भूषणकुमार उपाध्याय हे परिसंवादामध्ये अध्यक्ष म्हणून सहभागी झाले होते. तिसरे उदाहरण म्हणजे सातारा शहर वाहतूक विभागाचे सहायक पोलिस निरीक्षक अभिजित यादव वेळ मिळाला की अगदी शाहूपुरी पोलिस ठाण्यात, वाहतूक शाखेत पुस्तक वाचत बसलेले अनेकदा पाहिले आहे. या संमेलनातही त्यांनी शक्य तितका वेळ दिला; पण संमेलनाबाबत आंदोलनाचा इशारा, प्रत्यक्ष झालेले आंदोलन यामुळे सातारा पोलिस दलातील पोलिसांना अनेक कार्यक्रमांना मुकावे लागल्याची वस्तुस्थिती आहे. अशा साहित्य संमेलनाच्या पंढरीत खाकी बंदोबस्ताची व बंदुकीसोबतची खाकीची लेखणी टिपता आली.
फोर्स वनचे पोलिस अधीक्षक गजानन राजमाने हे साताऱ्यात सेवा बजावण्यासाठी 2018 मध्ये हजर झाले होते. पदोन्नतीमुळे त्यांना अवघ्या साडेतीन महिन्यांचा कालावधी मिळाला होता. त्यांनी जुगार, मटकाबाज, गुंडांना सळो की पळो करून सोडले होते. एरव्ही जुगाराच्या कारवाईत 500, 700 रुपये व जुगाराचे साहित्य जप्त अशी कारवाई होत असते. मात्र, गजानन राजमाने यांनी वेगळाच पॅटर्न राबवला. जुगार अड्ड्यावर धाड टाकली की ते शेड, बांबू, टेबल, खुर्च्या असे सर्व साहित्य टेम्पोमध्ये भरून जप्त करत. तसेच, जुगारासाठी मोबाईलचा वापर झाल्याने सायबर ॲक्टसारखे कलम ठोकत. या धडाकेबाज कारवाईमुळे त्यांनी जुगार, मटकाबाजांचे कंबरडे मोडले होते. अशा डॅशिंग अधिकाऱ्याला साहित्य संमेलनाच्या पंढरीत भेटण्यासाठी सातारा पोलिसांनी तसेच त्यांच्या शुभचिंतकांनी गर्दी केली होती. अनेक बुक स्टॉलवर त्यांचे ‘खांद्यावरचे स्टार’ हे पुस्तक दिमाखात झळकले होते.
निवृत्त आयपीएस डॉ. भूषणकुमार उपाध्याय हे साताऱ्यातील साहित्य संमेलनामध्ये बदलत्या ग्रामीण वास्तवाचे चित्रण आजच्या मराठी साहित्यात का दिसत नाही? या परिसंवादासाठी अध्यक्ष म्हणून उपस्थित होते. अध्यक्षीय मनोगत त्यांनी अक्षरश: गाजवले. मूळचे बिहारचे असलेले पण अस्खलित मराठी बोलणारे व गौरवाने महाराष्ट्राच्या संस्कृतीची महती ते सांगत होते. प्रत्येक वाक्याने व्वा..व्वा त्यांना मिळत होती. भूषणकुमार उपाध्याय यांनी तब्बल 7 पुस्तके लिहिली आहेत. यामध्ये सद्रक्षणाय खलनिग्रहणाय, माईंड मॅनेजमेंट, योग एंड माईंड मॅनेजमेंट अशी पुस्तके लिहिली आहेत. याशिवाय त्यांनी मानसशास्त्र, अध्यात्म, योग, तत्त्वज्ञान व मनोव्यवस्थापन या विषयांवर विविध वृत्तपत्रे व मासिकांमध्ये लेख लिहिले आहेत. तसेच शैक्षणिक, प्रशासकीय व आध्यात्मिक मंचावर व्याख्यानेदेखील दिली आहेत. पोलिस दलात प्रदीर्घ सेवा करत असताना त्यातूनही त्यांनी ही केलेल्या या कामामुळे ते बहुआयामी व्यक्तिमत्त्व ठरले आहे. साहित्य संमेलनामध्ये देखील त्यांनी आपल्या विचारातून अनेक पैलू उलगडून श्रोत्यांना जबरदस्त मेजवानी दिली.
या संमेलनात साताऱ्यातील पोलिसांचा मात्र हिरमोड झाला. एकतर 31 डिसेंबर व 1 जानेवारी या सिलेब्रेशनमुळे पोलिसांना दोन दिवस जागून बंदोबस्त करावा लागला. संमेलनामध्ये दुसऱ्या दिवशी व नायगाव येथील व्हीव्हीआयपी दौरे यामुळे पोलिसांवर बंदोबस्ताचा ताण आला. संमेलनाला विरोध होऊ लागल्याने संमेलन अध्यक्ष हे पोलिस बंदोबस्तात होते. यासाठी सुमारे 10 पोलिस तैनात होते. अशातच संमेलनात तिसऱ्या दिवशी भ्याड हल्ला झाल्याने पोलिस बंदोबस्तात पार गुरफुटून गेले. संमेलनाच्या इतर पदाधिकाऱ्यांना पोलिस बंदोबस्त ठेवावा लागला. यामुळे पोलिसांना संमेलनातील ना कार्यक्रमांना थांबता आले. ना कार्यक्रम पाहता व ऐकता आला. ही रुखरुख अनेक पोलिसांना लागली.