Marathi Sahitya Sammelan Pudhari Photo
सातारा

Satara Sahitya Sammelan : साहित्य संमेलनाच्या उद्घाटनावेळी 99 विद्यार्थी सादर करणार महाराष्ट्र गीत

1 ते 4 जानेवारीला रंगणार मराठी साहित्य संमेलन

पुढारी वृत्तसेवा

सातारा : महाराष्ट्राची संस्कृती आणि शूरवीरांच्या पराक्रमाची महती सांगणारे ‌‘जय जय महाराष्ट्र माझा‌’ हे राज्यगीत आणि मानवता, समता तसेच सेवाभाव आणि प्रेमाचा संदेश देणारी साने गुरुजी लिखित ‌‘खरा तो एकची धर्म, जगाला प्रेम अर्पावे‌’ ही प्रार्थना सातारा येथे होत असलेल्या 99 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटन सोहळ्यात 99 विद्यार्थी सामूहिकरित्या सादर करून इतिहास घडवणार आहेत.

मराठी साहित्य संमेलन दि. 1 ते 4 जानेवारी या कालावधीत सातारा येथे होत आहे. शतकपूर्व संमेलन वैशिष्ट्यपूर्ण ठरावे यासाठी संयोजक पराकाष्ठा करत असून संमेलनाच्या शुभारंभप्रसंगी संमेलन गीताबरोबरच ‌‘जय जय महाराष्ट्र माझा‌’ हे राज्यगीत आणि खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे ही प्रार्थना सादर होणार आहे.

अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी व संमेलनाचे कार्याध्यक्ष विनोद कुलकर्णी यांच्या पुढाकारातून ही अभिनव कल्पना राबवण्यात येत आहे. ही संकल्पना प्रत्यक्षात उतरवण्यासाठी विनोद कुलकर्णी व संमेलनाचे कोषाध्यक्ष नंदकुमार सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली समूहगीत समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीचे प्रमुख राजेश जोशी असून समन्वयक ज्येष्ठ रंगकर्मी सुजीत शेख आहेत. या अभिनव उपक्रमासाठी सातारा जिल्ह्यातील ग्रामीण व शहरी भागातील 25 शाळांमधून आठवी ते बारावीतील 99 विद्यार्थ्यांची निवड संगीत क्षेत्रातील तज्ज्ञांनी केली आहे.

‌‘खरा तो एकची धर्म‌’ या प्रार्थनेची नव्या चालीत संगीततज्ञ राजेंद्र आफळे यांनी बांधणी केली असून त्यांना संगीततज्ञ बाळासाहेब चव्हाण, संगीत संशोधक व अभ्यासक डॉ. स्वरदा राजोपाध्ये, ज्येष्ठ संगीत शिक्षिका वर्षा जोशी, ज्येष्ठ शाहीर भानुदास गायकवाड यांच्यासह संमेलनगीताचे गीतकार राजीव मुळ्ये तसेच सचिन राजोपाध्ये, मिलिंद देवरे, सचिन शेवडे यांचे सहकार्य लाभले आहे.

या उपक्रमात छत्रपती शाहू ॲकॅडमी स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, रयत शिक्षण संस्था, स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था, महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्था पुणे, डेक्कन एज्युकेशन सोसायटी पुणे यांच्या संबंधित शाळा व कनिष्ठ महाविद्यालये, न्यू इंग्लिश स्कूल, कन्या शाळा, शारदाबाई पवार आश्रम शाळा, यशोदा शिक्षण संस्था, पोदार इंग्लिश मिडियम स्कूल आदी शाळांचा समावेश आहे. स्वतंत्र संगीत शिक्षकांची उपलब्धता नसतानाही ग्रामीण भागातील शाळांचा उत्साहपूर्ण सहभाग आहे. शहरी भागातील शाळांमधील संगीत शिक्षकांच्या योगदानातून विद्यार्थ्यांना सहभागासाठी प्रोत्साहित करण्यात आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT