पाटण : पुढारी वृत्तसेवा
कोयना धरण पाणलोट क्षेत्रासह पाटण तालुक्यात पावसाचा जोर पूर्णपणे मंदावला आहे. धरणातील पाण्याची आवक, सोडण्यात आलेले पाणी व पाणी साठवण क्षमता व पूर्वेकडील महापूराची स्थिती लक्षात घेता धरणाचे दरवाजे सात फुटांवर स्थिर ठेवण्यात आले आहेत. धरणात प्रतिसेकंद 37,460 क्युसेक पाण्याची आवक होत असून पूर्वेकडे कोयना नदीपात्रात 32,100 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. धरणात सध्या 84.32 टीएमसी उपलब्ध तर 79.20 टीएमसी उपयुक्त पाणीसाठा आहे. धरणांतर्गत कोयना, नवजा, महाबळेश्वर परिसरात पावसाचा जोर कमी झाला आहे. छोट्या नद्या, नाले, ओढ्यांमधून
प्रतिसेकंद सरासरी 37,460 क्युसेक पाण्याची आवक होत असल्याने धरण पाणीसाठ्यात वाढ होत आहे. धरणाचे दरवाजे सात फूटांवर स्थिर ठेवण्यात आले असून यातून 30 हजार तर पायथा वीजगृहातील 20 मेगॅवॅट क्षमतेच्या दोन्ही जनित्रांद्वारे 40 मेगॅवॅट वीजनिर्मिती करून 2,100 असे प्रतिसेकंद 32,100 क्युसेक पाणी पूर्वेकडे कोयना नदीपात्रात सोडण्यात येत आहे. धरणात पाऊस व पाण्याची आवक वाढली तर त्यानंतरच जादा पाणी सोडण्याचा निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती धरण व्यवस्थापनाकडून देण्यात आली आहे.
पूर्वेकडील विभागातील पाऊस व धरणातून सोडलेल्या पाण्यामुळे कोयना नदीच्या पाणी पातळीत अद्यापही धोकादायक वाढ असल्याने नदीकाठची गावे, लोकवस्त्यांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. धरणाच्या एकूण 105.25 टीएमसी पाणीसाठ्यापैकी आता 84.32 टीएमसी पाणीसाठा झाला आहे. धरण पूर्ण क्षमतेने भरण्यासाठी यापुढे 20.93 टीएमसी पाण्याची आवश्यकता आहे. धरणात सध्या 84.32 टीएमसी उपलब्ध तर 79.20 टीएमसी उपयुक्त पाणीसाठा असून मागील चोवीस तासात धरण पाणीसाठ्यात 0.82 टीएमसीने तर पाणी उंचीत 11 इंच वाढ झाली आहे. शनिवार संध्याकाळी पाच ते रविवार संध्याकाळी पाच या चोवीस तासात कोयना 65 मिलिमीटर, नवजा 81 मिलिमीटर, तर महाबळेश्वर 111 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.