सातारा विभागात 300 बसेस खटारा Pudhari Photo
सातारा

सातारा विभागात 300 बसेस खटारा

पुढारी वृत्तसेवा

सातारा : पुढारी वृत्तसेवा

ग्रामीण भागातील गरिबांची जीवनवाहिनी म्हणून ओळखल्या जाणारी लालपरीची समस्या बिकट झाली आहे. महामंडळाच्या सातारा विभागातील 11 आगारांतील सुमारे 300 बसेस कालबाह्य झाल्या आहेत. या बसेसनी सुमारे 10 वर्षे वयोमर्यादा ओलांडली आहे. त्यामुळे कालबाह्य बसेस कुठेही बंद पडत असल्याने प्रवाशांना गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे.

सातारा विभागातील बसेस

  • एकूण उपलब्ध बसेस : 686

  • बंद बसेस : 30

  • मार्गावरील बसेस : 650

  • 10 वर्षे वयोमर्यादा ओलांडलेल्या बसेस :300

  • खासगी बसेस : एकही नाही

एसटीची संख्या कमी असली तरी एसटीने विविध सवलतींचा वर्षाव सुरु केला आहे. त्यामुळे एसटीकडे मोठ्या संख्येने प्रवासी आकर्षित झाला आहे. दिवसेंदिवसे एसटीकडे प्रवाशांचा ओढा वाढू लागला आहे. त्यामुळे तोट्यात गेलेली एसटी आता विविध सवलतीमुळे फायद्यात येवू लागली आहे; परंतु जुन्या व कालबाह्य झालेल्या बसेस कुठेही बंद पडू लागल्या आहेत. अस्वच्छ, नादुरुस्त व गळक्या बसेस रस्त्यावर धावताना दिसत आहेत. जिल्ह्यातील ग्रामीण भागासह लांब पल्ल्याच्या मार्गावरही जुन्या बस धावत आहेत. त्यामुळे वाढलेल्या प्रवाशांचा भार सोसताना एसटीची दमछाक होताना दिसत आहे.

सातारा विभागात सातारा, कराड, पाटण, वाई, महाबळेश्वर, मेढा, पारगाव-खंडाळा, फलटण, कोरेगाव, दहिवडी, वडूज या 11 आगारात 686 एसटीच्या बसेस आहेत. त्यापैकी 30 बसेस बंद अवस्थेत आहेत. त्यातच आता उपलब्ध असलेल्या 686 बसेसपैकी 300 बस या दहा वर्षे वयोमर्यादा ओलांडलेल्या आहेत. तर दररोज 650 बसेस विविध मार्गांवर धावताना दिसत आहेत. प्रवाशांच्या तुलनेत सातारा विभागात बसेस कमी असल्या तरी जास्तीत जास्त प्रवासी वाहतुकीवर अधिकारी व कर्मचार्‍यांनी भर दिला आहे. सातारा विभागात नवीन 26 बसेस दाखल झाल्या असून त्यापैकी सातारा आगारात 16 तर कराड व पाटण आगारास प्रत्येकी 10 बसेस दिल्या असून या नवीन बसेस स्वारगेट मार्गावर धावत आहेत.

प्रवाशांना 1 ते 2 तास बसेसची वाट पहावी लागते

सातारा विभागातून राज्यातील विविध जिल्ह्यात प्रवासी वाहतूक केली जात आहे; परंतु वेळेवर एसटी उपलब्ध होत नसल्याने प्रवाशांना 1 ते 2 तास बसेसची वाट पहावी लागत आहे. अशा परिस्थितीत प्रवाशांना चांगल्या सुविधा देण्यासाठी एसटी प्रशासनाकडून प्रयत्न होणे अपेक्षीत आहे. नवीन बसेस मिळण्यासाठी वारंवार एसटीच्या सातारा विभागामार्फत वरिष्ठ कार्यालयाकडे पाठपुरावा केला जात आहे. मात्र वरिष्ठ पातळीवरून काहीही हालचाल होत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळेच प्रवाशांना जुन्या बसमधून प्रवास करताना नाहक त्रास सोसावा लागत आहे.

महामंडळांचे नियम धाब्यावर...

एसटी महामंडळाच्या एसटी बसेस नियमानुसार 12 लाख किमी धावलेली एसटी प्रवासी वाहतुकीमधून बंद केली जाते. मात्र हे सर्व नियम धाब्यावर बसवून एसटी बसेस सुसाट धावताना दिसत आहेत. एकीकडे प्रवाशांची सोय तर दुसरीकडे प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. तरीही नव्या बसेस उपलब्ध होत नसल्याने जुन्या बसद्वारेच प्रवाशांची वाहतूक केली जात असल्याचे चित्र सर्रास सर्वत्र पहावयास मिळत आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT