सातारा : शहरात भटक्या कुत्र्यांचा असा सुळसुळाट वाढला आहे.  Pudhari Photo
सातारा

सातार्‍यात 3 हजार भटकी कुत्री

पुढारी वृत्तसेवा

सातारा : पुढारी वृत्तसेवा

सातार्‍यातील भटक्या कुत्र्यांचा प्रश्न गेली 10 वर्षांपासून सतावत असताना त्यावर योजलेला निर्बीजीकरणाचा उपाय फोल ठरू लागला आहे. भटक्या कुत्र्यांचे शहरात निर्बीजीकरण केले जात असले तरी उपनगरांतून शहरात येणार्‍या भटक्या कुत्र्यांनी डोकेदुखी वाढवली आहे. शहरात सुमारे 3 हजार भटकी कुत्री असल्यामुळे याचे करायचे काय? हाच नगरपालिका प्रशासनासमोरचा मोठा प्रश्न आहे.

सातारा शहरातील भटक्या कुत्र्यांच्या टोळ्या आक्रमक बनल्या आहेत. एकट्या दुकट्याला गाठून त्यांच्यावर हल्ले चढवण्याचे प्रकार सतत घडत आहेत. सात-आठ वर्षांपूर्वी गोडोली गार्डनच्या जागेवर देवी कॉलनीतील एका चिमुरड्याचे लचके याच भटक्या कुत्र्यांनी तोडले होते. भटक्या कुत्र्याच्या हल्ल्यात या निष्पाप एकुलत्या एक मुलाचा नाहक बळी गेला. अंगणात खेळणार्‍या लहानग्यांवर भटक्या कुत्र्यांनी केलेले हल्ले ताजे आहेत.

रात्रीच्यावेळी दुचाकीधारकांच्या मागे धावणारी भटकी कुत्री अपघातालाही कारणीभूत ठरत आहेत. या घटना घडत असताना प्राणीमित्र संघटना मात्र मूग मिळून गप्प आहेत. भटक्या कुत्र्यांमुळे एखाद्याला जीव गमवावा लागतो, कुणाला तरी गंभीर जखम होते याला जबाबदार कोण? नागरिकांचा जीव धोक्यात आला त्या त्या वेळी नगरपालिकेने खंबीर भूमिका घेतली आहे. मात्र, प्राणी मित्र संघटनांकडून कारवाईस सतत अडथळा आणला गेल्याने भटक्या कुत्र्यांच्या समस्येचा आज भस्मासूर होऊ पाहत आहे. सातार्‍यात 3 हजारांहून अधिक भटक्या कुत्र्यांची संख्या असल्याची प्राथमिक माहिती सातारा पालिकेकडे आहे.

विक्रेत्यांकडील टाकाऊ मांस खाण्याने कुत्री बनली भक्षक...

शहरातील हॉटेल व्यवसायिक, खाद्य पदार्थ विक्रेत्यांकडून उघड्यावर टाकल्या जाणार्‍या अन्नपदार्थावर या भटक्या कुत्र्यांची गुजराण होते. मांस व मच्छी विक्रेत्यांकडून ओढे व नाल्यांत जैविक कचरा टाकला जात असल्याने या कुत्र्यांना मांसाची चटक लागली आहे. त्यामुळे ही भटकी कुत्री भक्षक बनली असून ती माणसांवर हल्ले चढवू लागली आहेत.

फक्त 200 कुत्र्यांचे निर्बीजीकरण

भटक्या कुत्र्यांची वाढती संख्या थोपवण्यासाठी सातारा पालिकेने निर्बीजीकरणाचा निर्णय घेतला. 10 लाखांचे टेंडरही काढले. त्यामध्ये 1 हजार कुत्र्यांचे निर्बीजीकरणाचे काम एका खाजगी संस्थेला दिले. या संस्थेने गेल्या आठ महिन्यांत फक्त 200 भटक्या कुत्र्यांचे निर्बीजीकरण केले आहे. पावसामुळे निर्बीजीकरणाचे काम थांबवल्याचे सांगितले जात आहे.

पालिकेने भूमिका घेऊनही बोंब

एकीकडे नगरपालिकेने भटक्या कुत्र्यांबाबत गंभीर भूमिका घेतल्यावर बोंब मारली जाते आणि दुसरीकडे निर्बीजीकरणाचे काम रखडते याला काय म्हणावे? नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण होत असेल तर नगरपालिकेने त्याची जबाबदारी संबंधितांवर निश्चित करून कारवाई का करू नये? असा सवाल केला जात आहे.

उपनगरातील टोळक्यांचा धूडगूस

शहरातील भटक्या कुत्र्यांची संख्या नियंत्रणात ठेवताना निर्बीजीकरण हा पर्याय असला तरी ग्रामपंचायत भाग असलेल्या उपनगरांतून भटक्या कुत्र्यांच्या टोळ्याच्या टोळ्या शहरात येऊन धुडगूस घालत आहेत. दरवर्षी शेकडोंच्या संख्येने भटक्या कुत्र्यांची भर शहरात पडत आहे. त्यामुळे निर्बीजीकरणाचा उपाय योग्य आहे का? याचा विचार करावा लागेल.

समस्येवर कठोर उपाययोजना करा : रवींद्र ढोणे

शहरात भटक्या कुत्र्यांच्या दहशतीखाली नागरिक आहेत. निर्बीजीकरणाचे काम नीट करावे. शहरात भटक्या कुत्र्यांची संख्या प्रचंड वाढली आहे. त्यांच्या टोळ्या निर्माण झाल्या आहेत. भटक्या कुत्र्यांना जंगलात सोडावे. भटक्या कुत्र्यांच्या समस्येवर नगरपालिका प्रशासनाने कठोर उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नगरसेवक रवींद्र ढोणे यांनी केली आहे.

अपुर्‍या साधनांमुळे उपाययोजनांमध्ये अडचणी

भटक्या कुत्र्यांसाठी आवश्यक उपाययोजना करण्यासाठी नगरपालिकेकडे तांत्रिक कामांसाठी मनुष्यबळ नाही. तसेच अपुर्‍या साधनांमुळेही ठोस उपाययोजना करण्यात अडचणी येत आहेत. मात्र भटक्या कुत्र्यांचा भविष्यातील धोका ओळखून पावले उचलावीत अशी मागणी नगरसेवक करत आहेत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT